Pune News: पंतप्रधान मोदी यांचा दौरा; पालिका निवडणुकीतील पराभवाची भाजपची कबुली – मोहन जोशी

एमपीसी न्यूज – पाच वर्ष निष्क्रीय राहिल्याने महापालिका निवडणुकीत पराभव होण्याची भिती वाटू लागल्याने पुण्यातील भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा ठरविला आहे. पण हा भाजपचा प्रयत्न केविलवाणा आहे,अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

मेट्रो रेल प्रकल्प 20 टक्केही पूर्ण झालेला नाही तरीही मेट्रोच्या उदघाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. मुळा मुठा नदी सुधार प्रकल्पाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल. भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या उदासीनतेमुळे मुळा मुठा नदी सुधार प्रकल्प लांबला आणि आता महापालिका निवडणूक जवळ आल्याने पंतप्रधानांना बोलावून कामाचा देखावा उभा केला जात आहे. पुणेकरांना वास्तव लक्षात आल्याने भाजपची  केविलवाणी धडपड पुणेकर पहात आहेत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
महापालिकेच्या 2017 रोजी झालेल्या निवडणुकीत पुणेकरांनी भाजपचे 100 नगरसेवक निवडून दिले. त्यापूर्वी भाजपचे खासदार आणि सहा आमदारही निवडून दिले. एवढे यश पदरात टाकले असतानाही भाजपने निष्क्रीयता दाखवून पुणेकरांचा भ्रमनिरास केला. आपल्या या कारभारामुळे जनमत विरोधात जात आहे याची जाणीव भाजपला झाली असून पराभव दिसू लागल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना बोलाविण्याचा खटाटोप चालला आहे, असेही मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.