Pimpri News: प्रारुप आराखड्यावर तीन दिवसात तीनच हरकती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर तीन दिवसात तीनच हरकती आल्या आहेत. प्रभागाची व्याप्ती वाढविण्याबाबतच्या दोन आणि नैसर्गिक नाल्यानुसार सीमा करण्याची मागणी करणारी एक अशा तीन हरकती आज (गुरुवार) पर्यंत निवडणूक विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची  प्रभाग रचना मंगळवारी (दि.1) प्रसिद्ध झाली. 139 नगरसेवक संख्येसाठी तीन सदस्यांचे 45 तर चार सदस्यांचा एक प्रभाग असणार आहे. भौगोलिकदृष्ट्या प्रभाग क्रमांक पाच च-होली सर्वांत मोठा तर प्रभाग क्रमांक सात सॅण्डविक कॉलनी, रामनगर सर्वांत छोटा प्रभाग असणार आहे. महापालिका प्रशासनाने या प्रभाग रचनेवर हरकती मागविल्या आहेत. 14 फेब्रुवारी पर्यंत नागरिक महापालिका मुख्यालयातील निवडणूक कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयत हरकत नोंदवू शकणार आहेत.

1 फेब्रुवारीपासून आजपर्यंत म्हणजेच तीन दिवसात तीनच हरकती आल्या आहेत. प्रभागाच्या नावाच्या व्याप्तीमध्ये वाढ करावी.  प्रभाग क्रमांक 17 वल्लभनगर, एच.ए.कॉलनी, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगरच्या नैसर्गिक नाल्यानुसार सीमा कराव्यात अशा तीन हरकती आल्याचे निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.

हरकतींवर  26 फेब्रुवारी रोजी सुनावणी

प्रभागाचे नकाशे घेऊन जाणा-या नागरिकांची संख्या अधिक आहे. नकाशाची किंमत 50 रुपये आहे. संपूर्ण शहराच्या प्रभाग रचनेच्या नकाशाची किंमत 700 रुपये आहे. नागरिकांना 14 फेब्रुवारी 2022 पर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास 16 फेब्रुवारी रोजी सादर केले जाणार आहे. त्यावर  26 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, नागरिकांकडून प्रभाग रचनेचा सखोल अभ्यास केला जात असून पुढील आठवड्यात हरकतींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.