Pimpri News : हिंजवडी फेज दोनमध्ये पीएमपीच्या ई-बस होणार चार्ज; महावितरण उभारणार तीन हजार केव्हीएचे चार्जिंग स्टेशन

एमपीसी न्यूज – हिंजवडी फेज दोनमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ई-बस चार्जिंग करण्यासाठी महावितरण तीन हजार केव्हीएचे चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. त्या कामासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च येणार आहे. महावितरण कंपनीकडील दरपत्रकाप्रमाणे उच्चदाब ग्राहक होण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका महावितरण कंपनीला 98 लाख रूपये देणार आहे.

हिंजवडी फेज दोनमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ई-बस चार्जिंग करण्यासाठी महावितरण कंपनीच्या दरपत्रकाप्रमाणे काम करून मिळण्याबाबत पीएमपीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक यांनी 26 ऑक्टोबर 2020 रोजीच्या पत्राद्वारे महापालिकेला कळविले आहे. या ठिकाणी महावितरण कंपनीकडील तीन हजार केव्हीए क्षमतेचे चार्जिंग स्टेशन उभारण्याबाबत अंदाजपत्रक सादर केले आहे.

या कामासाठी 2 फेब्रुवारी 2021 रोजी पीएमपीच्या प्रतिनिधीसोबत प्रत्यक्ष स्थळ पाहणी देखील करण्यात आली आहे. त्याबाबत पिंपरी – चिंचवड महापालिका विद्युत विषयक कामांसाठी वापरत असलेल्या दरसुचीप्रमाणे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या कामासाठी एक कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित आहे.

या एक कोटी रुपये इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळावी तसेच महावितरण कंपनीकडील दरपत्रकाप्रमाणे या ठिकाणी उच्चदाब ग्राहक होण्यासाठी महावितरण कंपनीला 98 लाख रुपये देण्यात येणार आहेत. शुक्रवारी (दि. 18) झालेल्या महासभेत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.