Pimpri News : लघु उद्योगांच्या मूळ मिळकत करावरील विलंब शुल्क माफीचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य नगरविकास खात्याकडे सादर

पिंपरी चिंचवड मनपाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीची दखल

एमपीसीन्यूज : शास्तीकर वगळून मूळ मिळकत कराची रक्कम भरताना विलंब शुल्क माफ करण्याच्या तसेच शास्तीकर पूर्णपणे व सरसकट रद्द करण्याच्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मागणीची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेने राज्याच्या नगरविकास विभागाकडे रीतसर प्रस्ताव पाठविला आहे.

यंदाच्या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी खासदार डॉ. कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड परिसरातील लघुउद्योग संघटनांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत उद्योजकांनी शास्तीकर वगळून मूळ मिळकत कराची रक्कम भरताना शंभर टक्के विलंब शुल्क माफ करण्याची तसेच शास्तीकर पूर्णपणे व सरसकट रद्द करण्याची प्रमुख मागणी केली होती.

या मागणीच्या अनुषंगाने खासदार डॉ. कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र पाठवून उद्योगपूरक निर्णय घेण्याची मागणी केली होती.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या मागणीची दखल घेऊन मनपा आयुक्त पाटील यांनी राज्याचे नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावात जे नागरिक सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात अनधिकृत बांधकाम शास्तीकर वगळून उर्वरित कराची रक्कम एकरकमी भरण्यास तयार आहेत. त्यांच्यासाठी विशेष बाब म्हणून नगरविकास विभागाच्या पत्रापासून पुढील सहा महिन्यांच्या कालावधीकरिता अवैध बांधकाम शास्तीकर थकबाकीमध्ये बाकी ठेवून त्यांनी केलेला भरणा मूळ करांमध्ये समाविष्ट करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे.

खासदार डॉ. कोल्हे यांच्या मागणीवर पिंपरी चिंचवड मनपाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे शास्तीकरा संदर्भात दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, शास्तीकराचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नागरिकांना दिलासा देण्यासाठी याबाबत सकारात्मक निर्णय होणे आवश्यक आहे. त्यासाठी मनपा आयुक्त पाटील यांनी पाठवलेल्या प्रस्तावाचे आपण स्वागत करतो. तसेच हा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आवश्यकता भासल्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु असा विश्वास खा. कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.