Pune Crime News : अभ्यास न केल्यामुळे सात वर्षीय चिमुकलीला लाटण्याने मारहाण

एमपीसी न्यूज – पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अभ्यास करत नसल्याच्या कारणावरून निर्दयी पित्याने सात वर्षाच्या चिमुकलीला लाटण्याने व पोळपाटाने बेदम मारहाण केली. ताडीवाला रस्ता परिसरात मंगळवारी रात्री ही घटना घडली.

शेजारी राहणाऱ्या तरुणाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत संबधित पित्याला अटक केली आहे. नागेश महादेव जाधव (वय 36) असे अटक केलेल्या पित्याचे नाव आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी नागेश जाधव हा ताडीवाला रस्ता परिसरात पत्नी आणि सात वर्षाच्या मुलीसह राहतो. मोलमजुरी करून नागेश कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास त्याने अभ्यास का करत नाहीस असे म्हणत सात वर्षाच्या मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी राहणारे काही नागरिक नागेशच्या घराजवळ आले असता त्यांना नागेश हा आपल्या सात वर्षाच्या मुलीला त्या लाटण्याने आणि पोळपाटाने मारहाण करत असल्याचे दिसून आले.

त्यानंतर जमलेल्या काही नागरिकांनी नागेश च्या तावडीतून या चिमुरडीची सुटका केली. त्यानंतर ही नागेश याने अभ्यास का करत नाहीस ? असे विचारत तिला हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. जमलेल्या नागरीकांपैकी एकाने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नागेश याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.