Pimpri News: स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपकडून नितीन लांडगे यांचा अर्ज दाखल

निवड निश्चित; शुक्रवारी होणार शिक्कामोर्तब

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपकडून भोसरी विधानसभा मतदारसंघातील भोसरी गावठाणचे प्रतिनिधीत्व करणारे नितीन लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्थायीत भाजपचे बहुमत असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात असून त्यावर शुक्रवारी अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब होईल.

राष्ट्रवादीत असताना आणि आता चार वर्षात एकही पद लांडगे यांना मिळाले नव्हते. शेवटच्यावर्षी त्यांना स्थायीचे अध्यक्षपद मिळाल्याने श्रद्धा आणि सबुरीचे फळ मिळाले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मावळते अध्यक्ष संतोष लोंढेही भोसरी गावठाणचेच प्रतिनिधीत्व करत होते. दुस-यावेळी त्याच प्रभागाला स्थायीचे अध्यक्षपद मिळाले आहे.

स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज (मंगळवारी) दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज भरायचे होते. भाजपकडून नितीन लांडगे यांनी नगरसचिव उल्हास जगताप यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महापौर उषा ढोरे, उपमहापौर केशव घोळवे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके आदी यावेळी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहराचे प्रथम महापौर आणि माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे नितीन लांडगे हे पुत्र आहेत. त्यांची नगरसेवकपदाची दुसरी टर्म आहे. महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत ते पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आले होते. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली 2017 मध्ये नितीन लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून ते नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून आले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांना कोणतेही महत्वाचे पद मिळाले नव्हते. भाजपमध्येही मागील चार वर्षात त्यांना एकही पद मिळाले नव्हते. शेवटच्यावर्षी नितीन लांडगे यांना थेट स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे श्रद्धा आणि सबुरीचे फळ त्यांना मिळाले असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, चालू पंचवार्षिकमध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघाकडे चारवेळा तर एकवेळा चिंचवडकडे स्थायी समितीचे अध्यक्षपद राहिले आहे.

महापालिकेतील मधुकरराव पवळे सभागृहात शुक्रवारी (दि.5) रोजी दुपारी बारा वाजता अध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुण्यातील नोंदणी व मुद्रांक विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर कामकाज पाहणार आहेत.

स्थायी समितीत असे आहे पक्षीय बलाबल !

नितीन लांडगे, रवी लांडगे, सुरेश भोईर, शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे (भाजप), नीता पाडाळे (भाजप संलग्न) , पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, राजू बनसोडे, प्रवीण भालेकर (राष्ट्रवादी) आणि मीनल यादव (शिवसेना) असे 16 सदस्य स्थायी समितीत आहेत.

भाजपचे सर्वाधिक 10 आणि अपक्ष 1 सदस्य देखील भाजपसोबत आहे. त्यामुळे त्यांचे 11 सदस्य होतात. भाजपचे स्थायीत बहुमत असल्याने भाजपचा लांडगे यांची निवड निश्चित मानली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.