Pimpri news: महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी मतदान केंद्रानुसार जबाबदारी घेऊन काम करावे – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी एकदिलाने लढवत आहे. आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी मतदार यादीची प्रत्यक्ष पाहणी करावी. आपल्या जवळचे मतदार शोधून घरोघरी जाऊन मतदारापर्यंत पोहचावे. मतदान केंद्रानुसार जबाबदारी घेऊन काम करावे, अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्या.

पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणुकीबाबत नियोजन करण्यासाठी पिंपरी व चिंचवड विधानसभा क्षेत्राची बैठक आज (गुरुवारी) खासदार बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्डीतील शिवसेना भवनात पार पडली. पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरुण गणपती लाड आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार जयंत आसगावकर यांची प्रचार पत्रके, माहिती पोहचविणे व मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मतदारांना घेऊन जाणे. मतदान करून घेण्याबाबत महाविकास आघाडी कार्यकर्त्यांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन करण्यात आले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या दोनही उमेदवारांना विजयी करण्यासाठी शिवसैनिकांनी मतदार यादीची प्रत्यक्ष पाहणी करावी. आपल्या जवळचे मतदार शोधावेत. घरोघरी जाऊन मतदारापर्यंत पोहचावे. पदवीधर निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होते. हे लक्षात घेता शिवसैनिकांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील त्या-त्या प्रभागातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समवेत प्रभागनिहाय बैठका घ्याव्यात. एकत्रित समन्वयाने काम करावे. मतदान केंद्र लांब असणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदानासाठी आणणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी नियोजन पूर्वक काम करावे. मतदानादिवशी पसंती क्रमांक एकचे मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत.

जिल्हाप्रमुख गजाजन चिंचवडे यांनी मतदान केंद्रनिहाय पिनकोड निहाय मतदार याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदान कसे करावे याची शिवसैनिकांना माहिती दिली. ती माहिती मतदारांना देण्याचे आवाहन केले. प्रचारासाठी केवळ चार दिवस बाकी आहेत. त्यामुळे शेवटच्या चार दिवसांत सूक्ष्म नियोजन करून मतदारांपर्यंत पोहचावे. त्यांना बोलते करावे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्याची विनंती करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

शहरप्रमुख योगेश बाबर यांनी स्वागत केले. प्रास्ताविकपर मनोगतात उमेदवार प्रतिनिधी माधव पाटील यांनी उमेदवार महाविकास आघाडीचे पदवीधरचे अधिकृत उमेदवार अरुण गणपती लाड यांच्याबाबत माहिती दिली.

माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहर महिला संघटिका अ‍ॅड. उर्मिला काळभोर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.