Pimpri News: कोरोनाचा वाढता प्रसार, महापालिकेच्या सर्व सभा ‘ऑनलाइन’ घ्या; राज्य सरकारचा आदेश

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या नवीन विषाणू असलेल्या ओमायक्रॉनमुळे कोरोनाच्या संक्रमणाची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे एकत्रीकरण टाळण्यासाठी महापालिकेच्या सर्व सभा व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे, ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्यात, असा आदेश नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी राज्यातील महापालिका आयुक्तांना दिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची जानेवारी महिन्याची महासभा ऑनलाइनच होणार आहे.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी, मार्च मध्ये होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याची या पंचवार्षिकमधील सभा अखेरची असेल. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे शेवटची सभा ऑनलाइन होणार आहे. कोरोनाच्या पहिल्या, दुस-या लाटेत महापालिकेच्या सभा ऑनलाइनच होत होत्या. परंतु, कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने राज्य शासनाने 22 ऑक्टोबर 2021 रोजी सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्याची परवानगी दिली होती.

 

आता पुन्हा राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महानगरांमध्ये ओमायक्रॉनमुळे बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाने याची गंभीर दखल घेतली असून मोठ्या प्रमाणावरील एकत्रिकरण टाळण्यासाठी निर्बंध विहित केले आहेत. सद्यस्थितीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याने महापालिकांच्या सर्व बंधनकारक सभा, बैठका ऑनलाइन घ्याव्यात. महासभा, स्थायी समिती व इतर सर्व वैधानिक समित्यांच्या सर्व बंधनकारक बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे, ऑनलाइन पद्धतीनेच घेण्यात याव्यात. राज्यातील कोरोना संक्रमण परिस्थितीचा आढावा, 1 महिन्यानंतर वस्तुस्थिती व तपशीलाच्या आधार घेऊन या संदर्भातील पुढील निर्णय कळविण्यात येईल असे शासनाने स्पष्ट केले आहे.

 

याबाबत अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, ” कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य सरकारने सर्व सभा ऑनलाइन घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व सभा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.