Pimpri news: कोविड सेंटरमध्ये जाताना विशेष काळजी घ्या; अजितदादांचा महापौरांना सल्ला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे कोरोनाकाळात रुग्णालय, कोविड सेंटरमध्ये जात आहेत. आढावा घेतात. रुग्णांची विचारपूस करतात. महापौर ढोरे यांनी कोविड सेंटरमध्ये जात असल्याचे सांगताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापौरांना कोविड सेंटरमध्ये जाताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून महापौर उषा ढोरे संपूर्ण शहरात फिरतात. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतात. वयोमान जास्त असूनही त्या कोविड सेंटरमध्ये जातात. रुग्णांची विचारपूस करतात.  शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शहरातील रुग्णसंख्या 74 हजार 116 वर पोहोचली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. महापौर उषा ढोरे यांनी महापालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. याचबरोबर गुरुवारी (दि.24) जम्बो कोविड सेंटर मध्ये जाऊन रुग्णांशी व्हिडीओच्या माध्यमातून विचारपूस केली आहे.

तसेच कोविड सेंटरची पाहणी केली.  रुग्णांना वेळेत पाणी, चहा, नाश्ता, जेवण मिळते का इथपासून सेंटरमधील स्वच्छतेची पाहणी केली. जम्बो कोविड सेंटरमध्ये सध्या 300 रुग्ण आहेत. तर अ‍ॅटो क्लस्टर मध्ये असलेल्या कोविड सेंटरमध्ये 30 रुग्ण असून 3 व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती महापौर ढोरे यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोविड सेंटरमध्ये जाताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला महापौर ढोरे यांना  दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.