Pimple Gurav : ” मुळशी सत्याग्रहाचा लढा अजूनही संपलेला नाही!” – बबन मिंडे

एमपीसी न्यूज-  “मुळशी धरणामुळे विस्थापित (Pimple Gurav )झालेल्यांचा देशातील पहिला सत्याग्रहाचा लढा अजूनही संपलेला नाही!” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बबन मिंडे यांनी संवाद कट्टा पिंपळे गुरव येथे काल केले.

कलारंजन प्रतिष्ठान, नवी सांगवी या संस्थेने मुळशी सत्याग्रहाच्या शताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या मुक्तसंवाद या कार्यक्रमात बबन मिंडे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, एसपीज हास्ययोग विभागप्रमुख ॲड. प्रताप साबळे, कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, कार्यवाह शिरीष पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या मुक्तसंवादात साहित्यिक डॉ. पी. एस. आगरवाल, पावलस मुकूटमल, सुभाष चव्हाण, शामराव सरकाळे, आत्माराम हारे, नंदकुमार कांबळे, श्रीकांत पवार यांच्यासह हास्ययोग पिंपळे गुरवच्या महिला सदस्य आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बबन मिंडे पुढे म्हणाले की, “देशातील एक प्रमुख उद्योग केंद्र असलेल्या मुंबई शहराला अखंडित वीजपुरवठा करता यावा या उद्देशाने तत्कालीन ब्रिटिश सरकारने 1918 साली मुळशी पेटा येथे धरण बांधण्याचा निर्णय घेतला. निळा आणि मुळा या नद्यांच्या संगमावर धरण बांधून जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे कंत्राट टाटा पॉवर कंपनीला देण्यात आले.

या धरणामुळे परिसरातील 52 गावे विस्थापित होणार होती; भूसंपादन कायदा अस्तित्वात नसल्याने विस्थापितांना योग्य मोबदला मिळण्याची शाश्वती नसल्याने सहृदयी पत्रकार विनायक भुस्कुटे यांनी जनजागृती केली. पाशवी शक्तीचे ब्रिटिश सरकार आणि बलाढ्य टाटा कंपनी यांच्या विरोधात लढा द्यावा लागणार असल्याने अहिंसक मार्गाने सत्याग्रहाचा निर्णय घेण्यात आला.

पांडुरंग महादेव बापट ही जहाल क्रांतिकारी व्यक्ती ‘ज्ञानकोश’मधील आपल्या नोकरीचा त्याग करून मुळशी सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी दाखल झाली. त्यामुळे काँग्रेस पक्षातील मवाळ गट अस्वस्थ झाला; परंतु बापट यांच्याकडून अहिंसक मार्गाने सत्याग्रहाचे वचन घेऊन 16एप्रिल 1821 रोजी रामनवमीच्या दिवशी सत्याग्रहाचा प्रारंभ करण्यात आला. 27 जानेवारी 1922 रोजी विनायक भुस्कुटे आणि इतर नेतेमंडळींना अटक झाल्यानंतर सत्याग्रहाचे नेतृत्व पांडुरंग महादेव बापट यांनी अहिंसक मार्गाने अन् समर्पित भावनेतून केल्यामुळे मुळशीकर ग्रामस्थांनी त्यांना ‘सेनापती’ ही बिरुदावली बहाल केली.

काही अपरिहार्य कारणास्तव महात्मा गांधी या सत्याग्रहात सहभागी झाले नाहीत; तसेच काँग्रेसमधील जहाल आणि मवाळ गटांच्या परस्पर विरोधी विचारसरणीमुळे सत्याग्रहात दुफळी निर्माण झाली. त्यामुळे चार वर्षे अहिंसक मार्गाने लढा देऊनही सत्याग्रह अयशस्वी ठरला; आणि धरण बांधण्यात आले.

कालांतराने बॅरिस्टर गाडगीळ यांनी विस्थापित धरणग्रस्तांना आर्थिक मोबदला मिळवून दिला; परंतु दुर्दैवाने खरे जमीनमालक त्यापासून वंचित राहिले; आणि मूठभर धनदांडगे, सावकार यांनाच तो लाभ झाला. रास्त आर्थिक भरपाई, भूमिपुत्रांना नोकरी, स्वतःच्या मालकीची जमीन या गोष्टींसाठी विस्थापितांची चौथी पिढी वंचित असल्याने अजूनही मुळशी सत्याग्रहाचा लढा खऱ्या अर्थाने संपलेला नाही!”

सुरेश कंक यांनी, “सत्याग्रहात अंतिम विजय सत्याचाच होतो; परंतु त्यासाठी अनंत काळ प्रतीक्षा करावी लागते!” असे मत व्यक्त केले. ॲड. प्रताप साबळे यांनी सेनापती बापट यांच्या कार्याची माहिती दिली. श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविकातून, “मुळशी सत्याग्रह हा धरणामुळे विस्थापित झालेल्यांचा देशातील पहिला लढा असल्याने जरी तो अयशस्वी ठरला तरी त्याचे महत्त्व कमी होत नाही; कारण त्यामुळे देशातील प्रत्येक धरणात विस्थापित झालेल्यांना आपल्या हक्कासाठी लढण्याचे बळ मिळाले. शताब्दीच्या निमित्ताने याविषयी व्यापक जनजागृती व्हायला हवी!” अशी भूमिका मांडली. त्यानंतर प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले व शिरीष पडवळ यांनी आभार (Pimple Gurav ) मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.