Pimpri News: ‘विज्ञान आविष्कार नगरी’ला पद्म विभूषण रतन टाटा यांचे नाव द्या- महेश लांडगे

एमपीसी न्यूज – केंद्र सरकार पुरस्कृत योजनेंतर्गत ‘औद्योगिक नगरी पिंपरी-चिंचवड’मध्ये विज्ञान आविष्कार नगरी साकारली जाणार आहे. त्यासाठी तब्बल 191 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ‘पद्म विभूषण रतन टाटा विज्ञान आविष्कार नगरी’ असे नाव द्यावे, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक दर्जाची विज्ञान आविष्कार नगरी उभारली जणार आहे. त्याला ‘ भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी’ असे नाव देण्यात येईल, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडविणे यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 8 एकर जागा उपलब्ध असून, त्यापैकी एक एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. तर उर्वरित 7 एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाची, विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी पुढील पाच वर्षात उभारण्यात येईल. केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत यासाठी 191 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की, ”पिंपरी-चिंचवडमध्ये 191 कोटी रुपयांचा विज्ञान आविष्कार प्रकल्प साकारला जाणार आहे. राज्य सरकारच्या मंत्रीमंडळामध्ये या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. मात्र, या प्रकल्पाला ‘भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी’ असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, या प्रकल्पाला पिंपरी-चिंचवडच्या विकासात आणि औद्योगिक क्षेत्राला मोलाचे योगदान देणाऱ्या पद्म विभूषण रतन टाटा यांचे नाव द्यावे. याबाबत केंद्र सरकारमधील संबंधित मंत्रालयाशी संपर्क करुन पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने लवकरच मागणी करणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.