Pimpri News : भारतीय कामगार सेनेचे माजी अध्यक्ष रमाकांत मोरे यांचे निधन

0

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि भारतीय कामगार सेनेचे माजी अध्यक्ष रमाकांत मोरे यांचे वृद्धापकाळाने आज (शनिवारी) निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. आज सायंकाळी सात वाजता चिपळूण येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रमाकांत मोरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून संघटनेसाठी भरीव स्वरूपाचे योगदान दिले. या कार्याची दखल घेऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर तब्बल 13 वर्ष भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांनी त्यांच्या चिपळूण येथील टेरव येथील मूळ गावात जय भवानी एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना करून सुमन विद्यालय सुरू केले.

तसेच टेरव गावच्या विकासासाठी भरीव स्वरूपात योगदान दिले, त्याचबरोबर ते अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संस्थांवर कार्यरत होते.

_MPC_DIR_MPU_II

बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून मोरे यांची ओळख होती. ते कट्टर शिवसैनिक होते. बाळासाहेब यांच्या सोबत त्यांनी काम केले. पिंपरी-चिंचवड शहरात त्यांचा चांगला संपर्क होता. बजाज ऑटो, टेल्को, एमआयडीसीतील कंपन्याशी मोरे यांचा चांगला संपर्क होता. कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी लढा दिला. कामगार क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान आहे.

कोकणातील चिपळूणमध्ये वृद्धपकाळाने मोरे यांचे निधन झाले. आज सायंकाळी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पाठीमागे शिवसेनेचा एक अभ्यासू व कार्यतत्पर नेता जाण्याने सर्व क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्या पश्चात एक भाऊ, पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना आणि जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पिंपरी- चिंचवड मधील उद्योजक बाळासाहेब उ-हे यांचे ते साडू होत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.