Pimpri News : ‘के-विले’च्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेचे उद्या ठिय्या आंदोलन

एमपीसीन्यूज : सूचना देऊनही बांधकाम प्रकल्पावरील मजुरांना सुरक्षा साधने पुरविण्याकडे दुर्लक्ष केल्याने एका मजुराचा नाहक बळी गेला. त्यामुळे बांधकाम मजुराच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ‘के-विले’ या बांधकाम प्रकल्पाच्या संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उद्या, बुधवारी पिंपरी चिंचवड महापालिका भवनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

या संदर्भात मनसेच्या वतीने मनसेचे जिल्हा अध्यक्ष ॲड. रवींद्र गारुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. महापालिका हद्दीतील किवळे, आदर्शनगर येथे युनिक चिंतामणी डेव्हलपमेंट या कंपनीचा के-विले या नावाने बांधकाम प्रकल्प सुरु आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी या बांधकाम प्रकल्पाला भेट दिली असता तिथे काम करणाऱ्या मजुरांना सुरक्षा विषयक साधने पुरविली नसल्याचे निदर्शनास आले. त्यावर बांधकाम मजुरांना सुरक्षा साधने पुरविण्याची मागणी मनसेने केली. तसेच सुरक्षा साधनभावी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित करण्यात आला होता.

मात्र, मनसेच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान, 14 फेब्रुवारीला तपस रायपद मंडल (वय-31 रा. कलकत्ता) या बांधकाम मजुराचा काम सुरु असताना डकमध्ये पडून मृत्यू झाला. त्यामुळे मनसेने या प्रकल्पाच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासह प्रकल्पाचे बांधकाम बंद करण्याची मागणी कामगार उपायुक्त कार्यालयाकडे केली होती.

अखेर 23 फेब्रुवारीला या प्रकल्पाचे बांधकाम थांबविण्याचे आदेश कामगार उपायुक्त कार्यालयाकडून देण्यात आले. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत आजपर्यंत छुप्या पद्धतीने बांधकाम सुरूच ठेवण्यात आले. कामगार उपायुक्त कार्यालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकणी मनसेच्या वतीने 14 जून रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

अद्यापही या बांधकाम प्रकल्पाच्या संचालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे मसनेच्या वतीने उद्या, बुधवारी महापालिका प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले.

या आंदोलनात मनसे राज्य सरचिटणीस हेमंत संबूस, मनसे मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास,जिल्हा अध्यक्ष सचिन भांडवलकर, मावळ तालुका अध्यक्ष किरण गवळी, मनसे देहूरोड शहराध्यक्ष जॉर्ज दास आदी सहभागी होणार असल्याचे किरण गवळी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.