Chinchwad News : पुरुषांचाही होतोय छळ ! पिंपरी चिंचवडमध्ये भरोसा सेल सुरू करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – छळ केवळ महिलांचाच होत नाही, तर पुरुषांचाही होतो. त्यामुळे पुरुषांना देखील न्याय मिळावा यासाठी पुण्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातही भरोसा सेल सुरू करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी केली आहे.

गोडांबे यांनी याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना मेलद्वारे निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी बातमी आली आहे की फक्त पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातील भरोसा सेलमध्ये गेल्या वर्षभरात दीड हजार पुरुषांनी महिलांकडून होणाऱ्या शारीरिक, मानसिक छळाबद्दल तक्रारी दाखल केल्या आहेत.

या ऑन रेकॉर्ड आलेल्या तक्रारी असल्यामुळे प्रत्यक्ष अशी प्रकरणे अजून जास्त असण्याची शक्यता आहे. भारतातील पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांवर जास्त अन्याय, अत्याचार होतो हे जरी खरे असले तरी पुरुषांवर होणाऱ्या अन्यायातही वाढ होत आहे हेही नाकारून चालणार नाही.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, 23 जूनला वटपौर्णिमेच्या दिवशीच औरंगाबादमध्ये पत्नी पीडित पुरुष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपळाची पूजा करून चक्क मागणी केली की, ‘आयुष्यभर छळ करणारी तीच बायको नको, आम्हाला अविवाहित ठेवा’, असं साकडं या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट यमराजाला घातले.

औरंगाबादमध्ये पत्नी पीडित पुरुष संघटना असून महिलांपासून नाहक खोट्या केसेसमध्ये अडकलेले आहेत अश्या पुरुषांना ही संघटना पाठबळ देते. या संघटनेचे सदस्य पुरुष पिंपळाला फेऱ्या मारतात. तेही वटसावित्रीच्या एक दिवस आधी. हे पुरुष वडाला नाही तर पिंपळाला दोरा धरून फेऱ्या मारतात. या फेऱ्याही उलट्या असतात. महिलाप्रमाणेच तेही यमाला साकडे घालतात. मात्र, त्यांची मागणी महिलांच्या मागणीपेक्षा उलटी आहे. ‘आहे तीच पत्नी मला पुढच्या जन्मी नको, त्यापेक्षा आम्हाला अविवाहित ठेव’, अशी याचना ते पुरुष करतात.

काही महिला आपल्या पतीला नाहक छळतात. केसेस करतात, जेलमध्ये पाठवतात आणि कायदाही महिलांची जास्त बाजू घेतो. छळ झालेला पती परत सात जन्मी मिळावा अशी मागणी करतात, असं पत्नी पीडित पुरुष संघटनेचं म्हणणं आहे. देशात अनेक ठिकाणी अश्या पुरुषांच्या संघटना आहेत.

वर्क फ्रॉम आणि कोरोनाचं संकट असल्याने लोकं घरातच थांबत आहेत. त्यामुळे नवरा-बायकोचे छोट्या-मोठ्या कारणांवरुन वाद होत आहेत. मुलीच्या आई आणि बहिणींचे इंटरफेअर हे बऱ्याच प्रकरणांत दिसून येत आहे व त्यामुळे अनेक वाद हे विकोपाला जात आहेत. त्यामुळे अश्या वेळी पोलीस, त्यांच्याकडील अनुभवी समुपदेशक, वेगळे व्हायचे असल्यास मुले, त्यांचे शिक्षण व इतर खर्च यासाठी वकिलाकडून योग्य कायदेशीर मार्गदर्शन होणे खूपच गरजेचे आहे. त्यामुळे पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय इथेही भरोसा सेल तातडीने सुरु करण्याची गरज आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या वेबसाईटवर महिला कक्षाचा फोन नंबर आहे. त्याचे नाव बदलून भरोसा कक्ष करावा कारण पोलीस व सरकारी यंत्रणेने लिंगनिरपेक्ष काम करणे आवश्यक आहे. तसेच या कक्षाचा स्वतंत्र ई-मेल आयडी असावा. चांगले अनेक समुपदेशक व वकील पोलिसांनी या कक्षात नेमून सामाजिक, कौटुंबिक कलह कमी करण्यास मदत करून उद्ध्वस्त होणारे अनेक संसार वाचवावेत, अशी मागणी गोडांबे यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.