Pimpri : सत्ताधारी अन् विरोधकांचा ‘मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा’

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – कायमस्वरुपी एक दिवसाआड पाणीपुरवठा, वाढीव खर्च, कामांना भाववाढीसह मुदतवाढ, महापालिका इमारत बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव, नवीन प्रस्तावीत इमारतीचा वाढीव 100 कोटींचा खर्च, विकासकांमधील रिंग, स्मार्ट सिटीतील अनागोंदी कारभार यावर महापालिकेतील विरोधातील राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे मूग गिळून गप्प आहेत. सत्ताधारी भाजपच्या सुरात सूर मिसळत विरोधक आपले हितसंबध जोपासत आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे गलितगात्र विरोधक लाभले आहेत. पारदर्शक कारभाराची हमी देणा-या भाजपकडून अपेक्षाभंग झालेल्या शहरवासीयांची सत्ताधा-यांवर वचक ठेवण्याची जबाबदारी असलेल्या विरोधकांनी देखील घोर निराशा केली आहे.

महापालिकेत पाशवी बहुमतासह भाजप सत्तेत आहे. तर, 38 नगरसेवकांचे एवढे संख्याबळ असलेल्या विरोधक पहिल्यांदाच लाभला. राष्ट्रवादीकडे शहरवासीयांनी प्रबळ विरोधी पक्षाची जबाबदारी सोपविली. तर, शिवसेनेला नऊ नगसेवक निवडून देत आणखीन खाली आणले. परंतु, शहरवासीयांनी असा कौल देऊनही दोन्ही पक्षाच्या कारभारात सुधारणा झाली नाही. सत्ताधा-यांच्या सुरात सूर मिसळण्यातच हे पक्ष धन्यता मानत आहेत. महापालिका निवडणूक दोन वर्षांवर येऊन ठेपली आहे. तरी देखील प्रबळ विरोध होताना दिसून येत नाही.

प्रशासनाने एक दिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवला. शहरवसीयांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नांवर सत्ताधा-यांनी प्रशासनाच्या सुरात सूर मिसळले. तर, गलितगात्र झालेले विरोधक मूग गिळून गप्प बसले. प्रशाकीय कामकाजासाठी नवीन इमारत पूर्ण झाल्यानंतर जुनी चार मजली मोक्याच्या ठिकाणची इमारत ‘व्यापारी तत्तावर’ देण्याच्या नावाखाली बिल्डराच्या घशात घालण्याचा निर्णय सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून घेतला हे शहरवासीयांचे दुर्दैव आहे. यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईच्या 647 कोटीच्या कंत्राटात रिंग झाल्याचे दिसूनही विरोधक शांत आहेत.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणावर 58 लाखाचा वाढीव खर्च, भोसरीतील कुस्ती प्रदर्शन केंद्रावरील वाढीव खर्च, निगडीतील तीन मजली पुलाला भाववाढीसह मुदतवाढ देऊनही विरोधक त्यावर ‘ब्र’ काढत नाहीत. कामाला विलंब का झाला ? ठेकेदावर दंडात्मक कारवाई का केली नाही? असा प्रश्न प्रशासन आणि सत्ताधा-यांना विचारण्याचे साधे धाडस देखील विरोधक करु शकले नाहीत. दापोडी, आकुर्डी दुर्घटनेतील अहवालाचे काय झाले ? कोण दोषी आहे? कोणावर कारवाई केली ? हे देखील विरोधक विचारु शकत नाहीत. त्यामुळेच विरोधकांवर ‘सेटिंग’चे आरोप जोर धरत आहेत. महापालिकेत विरोधक आहेत की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

स्मार्ट सिटीत स्मार्ट एरियावरच पैशांची उधळपट्टी होत आहे. स्मार्ट सिटीत अनागोंदी कारभार सुरु आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले भाजपच्या विधानपरिषदेचे आमदार स्मार्ट सिटीचे काम करतात. या कामांमध्ये अनागोंदी आहे. स्मार्ट सिटीतील कंत्राटात ‘लाडां’नांच ‘प्रसाद’ दिला जात आहे. त्यावरही विरोधक गप्प आहेत.

सत्ताधा-यांनाकडून चुकांवर चुका होत आहेत. त्यांचा कारभार चव्हाट्यावर आणण्याची मोठी संधी विरोधकांना आहे. परंतु, विरोधक मात्र सत्ताधा-यांच्या सुरात सूर मिसळत आहेत. महापालिका निवडणूक दोन वर्षांवर येऊन ठेपली असताना सत्ताधारी विरोधी वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्न विरोधकांकडून केला जात नाही. सत्ताधारी आणि विरोधकांच्या अभद्र युतीमध्ये मात्र करदाते नाहक भरडले जात आहेत. त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यास कोणीच वाली राहिला नाही.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर भाजपधार्जिणे असे आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना राज्यातील सत्तेत आले आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर चाणाक्ष आयुक्त हर्डीकर यांनी देखील भाजपधार्जिणी भूमिका सोडली. कामकाजाच्या पद्धतीत बदल केला. त्यामुळे विरोधातील राष्ट्रवादी, शिवसेनेला देखील आयुक्त आपलेसे वाटू लागले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.