Pimpri : पिंपरी-चिंचवड मनपा सेवक पतसंस्थेला महाराष्ट्र राज्य फेडरेशनचा दीपस्तंभ पुरस्कार

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शशिकांत झिंजूर्डे यांनी स्वीकारला पुरस्कार

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्यातील उत्कृष्ट पतसंस्थांना देण्यात येणारा दीपस्तंभ पुरस्कार पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था या संस्थेला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला. राज्यातील पतसंस्था संचालकांचे दोन दिवसाचे निवासी प्रशिक्षण शिबिर लोणावळा येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटप्रसंगी मंगळवारी (दि. 25) सहकार मंत्री देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

या वेळी आमदार बाळा भेगडे, सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे शेखर चरेगावकर, सहकार आयुक्त सतीश सोनी, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबन झिंजूर्डे तसेच पतसंस्थेचे चेअरमन आबा गोरे व संचालक उपस्थित होते.

पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक लाख रुपयांच्या सुरक्षा ठेव योजनेचा शुभारंभ या वेळी सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनच्या वतीने पुणे विभागातून प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत झिंजूर्डे, चेअरमन आबा गोरे, उपाध्यक्ष संजय कुटे, खजिनदार महाद्रंग वाघेरे, संचालक भगवान मोरे, महादेव बोत्रे, दिलीप गुंजाळ, राजू चिंचवडे, रमेश चोरघे, यशवंत देसाई, अंबर चिंचवडे, नंदू घुले, व्यवस्थापक नंदकुमार कोंढाळकर यांनी स्वीकारला.

यावेळी बबन झिंजूर्डे स्वागत करताना म्हणाले की, या पतसंस्थेच्या वतीने सभासदांचे आर्थिक हित जोपासतच सामाजिक जबाबदारी म्हणून बळीराजाला मदत व्हावी या उद्देशाने या वर्षी राज्य सरकारकडून तूरडाळ विकत घेऊन सभासदांना शेअर्सच्या प्रमाणात मोफत वाटण्याचा व केरळ येथील अतिवृष्टीत बाधित झालेल्या नागरिकांना मोफत तूरडाळ वाटण्याचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच सातारा, जांब गावातील श्री मारुती देव व चिलाई देवी ट्रस्टच्या वतीने गावात बांधण्यात येणा-या बंधा-यास एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. सलग तीन वर्ष ऑडीट वर्ग ‘अ’ मिळविणारी ही संस्था राज्यात रोल मॉडेल ठरेल असा विश्वास झिंजूर्डे यांनी व्यक्त केला.

आपल्या प्रास्ताविकात चेअरमन आबा गोरे यांनी म्हणाले की, मार्च 2018 अखेर संस्थेने 9.36 कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. तर सभासदांच्या ठेवी 55.58 कोटी रुपयांच्या आहेत. मुदतकर्ज मर्यादा दहा लाख व अल्पमुदत कर्ज वीस हजार रुपये देणारी ही पतसंस्था स्वभांडवलावर कर्ज वितरण करीत आहे. थकीत कर्जाचे प्रमाण नगण्य आहे.

सूत्रसंचालन संजय कुटे आणि आभार महाद्रंग वाघेरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.