Pimpri : पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा करणा-या अकार्यक्षम आयुक्तांची तत्काळ बदली करा

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवार (दि.25) पासून दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. पवना धरण पूर्ण भरलेले असताना केवळ नियोजनाचा अभाव, अकार्यक्षम, गलथान, भ्रष्ट कारभारामुळेच शहरवासीयांना हिवाळ्यातच पाणीकपातीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप करत आयुक्तांची तत्काळ बदली करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, महापालिका प्रशासन यांच्या अकार्यक्षम गलथान व भ्रष्ट कारभारामुळेच असा निर्णय घ्यावा लागला आहे. याचा शारीरिक, मानसिक, आणि आर्थिक त्रास शहरातील करदात्या नागरिकांना बसत आहे. विशेषतः महिलांना या निर्णयाचा खूप त्रास सहन करावा लागत आहे.

यावर्षी पावसाळा चांगला झालेला असून परतीचा पाऊस देखील मोठा झाला आहे. पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना केवळ नियोजनाचा अभाव व ढिसाळ अकार्यक्षम, भ्रष्ट कारभारामुळे पाणीपुरवठा विभागाचा खेळखंडोबा झाला आहे. महापालिकेतील विविध प्रकल्पाच्या निविदा, ठेके, त्यातील रिंग सल्लागारांच्या नियुक्त्या, थेट पद्धतीने कामे त्यातून टक्केवारीचे भ्रष्ट राजकारण यामध्ये सत्ताधारी भाजपा व प्रशासन मश्गुल असून त्यांना पाणी, आरोग्य, स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर काम करण्यासाठी वेळ नाही, असा आरोपही भापकर यांनी केला आहे.

सत्ताधारी आणि प्रशासन केवळ पैसा कमवणे याच उद्देशाने काम करत आहेत. या शहरातील नागरिकांच्या जीविताशी खेळत आहेत. त्यामुळे अशा अकार्यक्षम संवेदनाहीन सत्ताधारी भाजपा व प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. हा निर्णय जनतेच्या विरोधात असून हा निर्णय त्वरित मागे घेण्याचे आदेश व्हावेत व आयुक्तांची त्वरित बदली करावी, अशी विनंती भापकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.