Pimpri: पिंपरी-चिंचवडकरांनी पवारांच्या तिस-या पिढीला नाकारले

(गणेश यादव)

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडवर 15 वर्ष एकहाती हुकुमत गाजविली. शहरातील नागरिकांनी पवारांना भरभरुन दिले. पण, तिस-या पिढीला मात्र; पिंपरी-चिंचवडकरांनी नाकारल्याचे लोकसभेच्या मतदानातून स्पष्टपणे दिसून येत आहे. चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पार्थ यांनी कमी मते मिळाली असून शहरवासियांनी पवार आणि राष्ट्रवादीला पुन्हा नाकारल्याचे दिसून येते.

शहराचा परिसर पूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघात येत होता. या मतदारसंघाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेक वर्ष संसदेत केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराचे नेतृत्व केले. परंतु, 2009 मध्ये पुनर्रचनेत मावळ लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून मतदारसंघात ताकद असूनही गटबाजीमुळे राष्ट्रवादीला विजय मिळविता आला नाही. सातत्याने पराभव होत असल्याने यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. पवार कुटुंबातील उमेदवार असल्याने सर्व गट-तट विसरुन एकत्र आल्याने दिसले. परंतु, त्याचे रुपांतर मतदानात झाले नाही.

मावळ आणि पिंपरी-चिंचवडच्या जनतेने पवारांच्या तिस-या पिढीला नाकारले. पिंपरी-चिंचवड या दोन्ही मतदारसंघातून पार्थ यांना कमी मतदान झाले. चिंचवडमधून केवळ 79 हजार 717 तर पिंपरीतून 61 हजार मते मिळाली. तसेच घाटाखालील पनवेल आणि उरण मध्ये देखील मते मिळाली नाहीत. केवळ उरण मध्ये तीन हजारांची आघाडी मिळाली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी श्रीरंग बारणे यांना चिंचवडमधून तब्बल 1 लाख 76 हजार 475 मते घेत तब्बल 96 हजार 758 मतांची आघाडी घेतली. तर पिंपरीतून 1 लाख 3 हजार 235 मते मिळवत 41 हजार 294 मताधिक्य घेतले. मावळमधून 1 लाख 5 हजार 272 मते घेत 21 हजारांची आघाडी घेतली असून ही मते वाखण्याजोगी आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 वर्ष राज्य केले. महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून शहरात विकास कामे केले. परंतु, 2014 च्या लोकसभा, निवडणुकीपासून त्यांची जवळच्या सहकार्यांनी साथ सोडली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या पिंपरी महापालिका निवडणुकीत देखील राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपची ‘नको बारामती, नको भानामती’ ही टॅगलाईन शहरवासियांना भावली होती. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर अजित पवार यांचे शहरातील वर्चस्व खालसा झाले होते.

शरद पवार, अजित पवार यांनी शहराचा विकास केला आहे. त्या विकासाच्या जोरावर राष्ट्रवादीने पार्थ यांच्यासाठी मते मागितली. जनतेला भावनिक आवाहन केले. परंतु, जनतेने पवारांच्या तिस-या पिढीला नाकारले. तर, शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी स्थानिक नेतृत्वाचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. आजोबांना स्वीकारले, वडिलांना स्वीकारले आता नातवाला स्वीकारायचे का?….घराणेशाहीला कधीपर्यंत स्वीकारायचे असे मुद्दे उपस्थित केले. हेच मुद्दे शहरवासियांना भावल्याचे झालेल्या मतदानातून दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like