Pimpri : मेट्रोचे पिंपरी-चिंचवड मधील काम 40 टक्के पूर्ण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. दापोडीपासून ते पिंपरी-चिंचवड महापालिकेपर्यंत 7.619 किलोमीटर अंतराचे हे काम सुरु असून मागील दीड वर्षात मेट्रोने कार्यपूर्तीचा 40 टक्क्यांचा टप्पा गाठला आहे. सेगमेंट खांबांवर बसविणे ही सर्वात वेळखाऊ प्रक्रिया आहे. सध्या 185 सेगमेंट ट्रॅकवर बसवले असून 788 सेगमेंट तयार आहेत. यामध्ये 2.263 किलोमीटर अंतरापर्यंत सेगमेंट टाकता येणार आहेत. आणखी 1576 सेगमेंट मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड मधील कामासाठी लागणार असून सेगमेंट निर्मितीचे मेट्रोने 40 टक्के काम पूर्ण केले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये मेट्रोचे एकूण 281 खांब येतात. त्यातील 133 खांबांचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील 58 खांबांवर मेट्रोचे रूळ टाकण्यासाठी कॅप बसविण्यात आले आहे. पुढील 46 खांबांची पायाभरणी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये मेट्रोचे एकूण सहा स्थानके आहेत. त्यातील फुगेवाडी, कासारवाडी आणि संत तुकाराम नगर या तीन स्थानकांचे काम सुरु करण्यात आले आहे. या आकडेवारीवरून मेट्रो 2019 पर्यंत पिंपरी-चिंचवड शहरात धावणार असल्याचा विश्वास मेट्रोकडून व्यक्त करण्यात येत आहे.

संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनच्या कॉनकोर्स लेव्हलच्या (आसन पातळी) पहिल्या पिअर आर्मचे काँक्रीट गुरुवारी (दि. 2) पूर्ण करण्यात आले. प्रत्येक मेट्रो स्टेशन 10 खांबांवर तयार होणार आहे. संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन 140 मीटर लांब व 21.60 मीटर रुंद असणार आहे. प्रत्येक मेट्रो स्टेशनवर प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी चार एन्ट्री व एक्झिट असून त्यामध्ये पायऱ्यांचा जिना, सरकता जिना, लिफ्ट व पादचारी पुलाची सुविधा देण्यात येणार आहे. कॉनकोर्स लेव्हल पर्यंत सर्व नागरिकांना मोफत प्रवेश (विना तिकीट) असून मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तिकीट घेऊन फ्लॅटफॉर्मवर जाता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.