Pimpri: तयारी विधानसभेची! शरद पवार मैदानात; उद्या भोसरीत पदाधिका-यांसोबत बैठक

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीची राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जातीने लक्ष घालण्याचे ठरविले असून उद्या (गुरुवारी) प्रमुख पदाधिका-यांसोबत ते बैठक घेणार आहेत. या बैठकीत शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे.

भोसरी एमआयडीसीतील हॉटेल पर्ल येथे गुरुवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत शरद पवार पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा मतदारसंघानुसार ते आढावा घेणार आहेत.

  • एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची दिवसेंदिवस पिछेहाट होत आहे. महापालिका आणि लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या सलगच्या दोन पराभवांमुळे कार्यकर्ते हताश झाले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थचा दारूण पराभव झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते निराश झाले आहेत.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाला उभारी देण्यासाठी दस्तुरखुद्द शरद पवार यांनी या तीनही मतदारसंघात जातीने लक्ष घालण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादीचे आजी – माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिका-यांशी तीनही मतदार संघातील विविध विषयांवर ते चर्चा करणार आहेत.

  • आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना कोणती खबरदारी घ्यायला हवी, कोणती रणनिती असेल, त्या दृष्टीने मोर्चबांधणी कशी केली पाहिजे या बाबींवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.