Pimpri: ‘हातावर पोट असणाऱ्या माथाडी, बांधकाम कामगारांना तत्काळ सरकारी मदत करा’

कामगार नेते इरफान सय्यद यांची मागणी

एमपीसी न्यूज – हातावर पोट असणारे माथाडी, बांधकाम कामगार लॉकडाऊनचे पालन करत घरात बसून आहेत; मात्र, या कामगारांना कोणतीही सरकारी मदत अद्यापर्यंत मिळाली नाही. औद्योगिकनगरीतल हजारो कामगार मदतीपासून वंचित असल्याने कामगार नेते इरफान सय्यद यांनी संताप व्यक्त केला. तसेच हातावर पोट असणा-या  कामगारांना तत्काळ मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कोरोना विषाणू या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. देशासह राज्यातील नागरीक प्रथम कर्तव्य समजून या आदेशाचे पालन करीत, घरीच राहत आहेत. पर्यायाने महाराष्ट्रातील हातावर पोट असणारा असंघटीत बांधकाम कामगारसुद्धा सरकारी आदेशाचं तंतोतंत पालन करीत आहे. मात्र, या बांधकाम कामगाराला भ्रांत आहे ती दोन वेळच्या जेवणाची. ही गरज घरात बसून पूर्ण होणार नाही.

कोरोनामुळे आज राज्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारा हा कामगार रोजगाराअभावी घरात उपाशी मरत आहे. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक या बांधकाम कामगारांचा विचार करून किमान दोन वेळच्या जेवणासाठी या कामगारांच्या खात्यावर विशेष अनुदान म्हणून सरसकट दहा हजार रुपये एवढी रक्कम जमा करावी.

पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या माध्यमातून 25 हजार नोंदणीधारक बांधकाम कामगार आहेत. ही परिस्थिती पाहता देशातील 21 दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर या कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. बांधकाम कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली असून, त्याची संख्या 13  लाख इतकी आहे.  लॉकडाऊनला आठ दिवस उलठून गेले तरी या कामगारांना अद्यापर्यंत कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही. त्यामुळे कामगारांचे हाल होत असून तत्काळ मदत करावी, अशी मागणी सय्यद यांनी केली आहे.

”काही बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्याकडे असलेल्या कामगारांची राहण्याची, जेवण्याची सोय केली आहे. ज्या कामारांची व्यवस्था झाली नाही. त्यांची तहसील कार्यालयामार्फत सोय केली जात आहे. महापालिका, सामाजिक संस्थाकडून मदत मिळत आहे. तहसील कार्यालयात पिशव्या भरुन ही मदत कामगारांना घरपोच देखील दिली जात आहे.  तसेच रेशन दुकानदारांकडे अन्यधान्य वाटप सुरु झाले आहे. ”.  गीता गायकवाड : तहसीलदार.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.