BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: ‘वायसीएमएच’च्या पदव्युत्तर संस्थेसाठी 15 लाखांची पुस्तक खरेदी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर संस्थेसाठी औषध वैद्यकशास्त्र आणि शल्य चिकित्सा या विषयाची 451 पुस्तके खरेदी केली जाणार आहेत. पुण्यातील बी.जे.मेडीकल कॉलेज को-ऑपरेटिव्ह कंन्झ्न्युमर स्टोअरमधून थेट पद्धतीने पुस्तक खरेदी केली जाणार असून त्यासाठी 15 लाख रुपये खर्च येणार आहे.

संत तुकारामनगर येथे महापालिकेचे 750 खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. या ठिकाणी औद्योगिकनगरीसह आजुबाजूच्या ग्रामीण भागातून तसेच राज्याच्या इतर भागातूनही हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. रूग्णालयात अस्थिरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, दंतरोग, कर्करोग असे विविध विभाग आहेत. वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असते. त्यामुळे रुग्णांची अचडण होते. या ठिकाणी पूर्णवेळ, नियमित आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावेत. यासाठी रुग्णालयामध्येच स्वतंत्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे.

  • या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेच्या सात अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. यामध्ये कान, नाक, घसा (तीन जागा), भूलशास्त्र (4), मानसोपचार (3), स्त्रीरोग व प्रसुती (3), बालरोग (4), विकृतीशास्त्र (3), अस्थिरोग (4)या सात अभ्यासक्रमांना आणि त्यासाठी 24 जागा भरण्यास मान्यता मिळाली आहे.

पदव्युत्तर संस्थेसाठी औषध वैद्यकशास्त्र आणि शल्य चिकित्सा या विषयांची पुस्तके खरेदी केली जाणार आहेत. 451 पुस्तके खरेदी करण्यासाठी बी.जे.मेडीकल कॉलेज को-ऑपरेटिव्ह कंन्झ्युमर स्टोअर यांनी 14 लाख 99 हजार 693 दरपत्रक सादर केले आहे. त्यानुसार त्यांच्याकडून औषध वैद्यकशास्त्र आणि शल्य चिकित्सा या विषयाची पुस्तके निविदा न मागविता थेटपद्धतीने खरेदी केली जाणार आहेत. याबाबतचा प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3