Pimpri : दहावीच्या परीक्षेला शांततेत प्रारंभ

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून शांततेत सुरुवात झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळातर्फे सर्व परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्हीची नजर असून दक्षता समित्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

आज मराठी विषयाचा पहिलाच पेपर आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थी व पालकांनी गर्दी केली होती. सकाळी साडेदहा वाजता परीक्षार्थींची कसून तपासणी करूनच त्यांना आत सोडण्यात येत होते. परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पिंपरी-चिंचवड शहरातील 22 हजार 307 विद्यार्थी ही परीक्षा देणार असून त्यासाठी शहरात 36 केंद्रे आहेत. यंदा विद्यार्थ्यांची संख्या एक हजाराने वाढली असून महापालिकेचे एक भरारी पथक व शासनाची भरारी पथके तपासणीसाठी आहेत. त्यात महापालिका व खासगी शाळांचे पाच सदस्य असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पराग मुंडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.