Pimpri: शहरात दहा दिवसांचा कडक लॉकडाउन करा – नाना काटे

Ten days of strict lockdown in the city - Nana Kate : लॉकडाऊन याकाळात संचारबंदीही लागू करावी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना संसर्गांचा वाढता वेग लक्षात घेता. कोरोना संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरात 10 दिवस कडक लॉकडाऊन करावा. याकाळात संचारबंदीही लागू करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे. संचारबंदीमुळे नागरिकांवर निर्बंध येऊन कोरोना संसर्गाची साखळी खंडीत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात काटे यांनी म्हटले आहे की, शहरामध्ये कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शहरात आज अखेर 4810 सकारात्मक कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.

सुमारे 1868 कोरोना बाधितांवर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचार चालू आहेत. दररोज 300 ते 400 च्या पटीत कोरोनाबाधित सापडत आहेत. काल, सोमवारी शहरात उच्चांकी म्हणजे 573 कोरोना बाधित सापडले आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे.

जुलै – ऑगस्टमध्ये सुध्दा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढणार असल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसाठी सरकारी तसेच खासगी रुग्णानलयांमध्ये आताच बेड उपलब्ध नाहीत.

त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या अशीच वाढत राहिली,तर शहरातील खासगी तसेच सरकारी यंत्रणांवर अतिरीक्त ताण येऊन शहरातील रुग्णांना वैद्यकीय उपचार करणे शक्य होणार नाही. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मर्यादेत ठेवण्याचे अवघड आव्हान वैद्यकीय यंत्रणेवर आहे.

लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे नागरीकांची वर्दळ वाढल्याने कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे काही नगरसदस्यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे.

त्यामध्ये दुर्दैवाने राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ताकाका साने यांचे निधन झाले आहे. तसेच पालिकेच्या 30 कर्मचारी / अधिका-यांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शहरात काही दिवस कडक संचारबंदी लागू करण्याची अत्यंत गरज आहे. अन्यथा शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढण्याची शक्यता जास्त आहे.

सध्यस्थितीमध्ये नवी मुंबई, ठाणे, कल्याण,डोंबवली, पनवेल इत्यादी शहरांनीसुध्दा कडक संचारबंदी लागू केली आहे. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरात सुध्दा कडक संचारबंदी लागू करण्याची आवश्यकता आहे.

शहरात 10 दिवस कडक संचारबंदी लागू करण्यात यावी. यामुळे नागरीकांवर निर्बंध येऊन कोरोना संसर्गाची साखळी खंडीत होण्यास मदत होईल.

शहरातील कोरोना संसर्गांचा वेग मंदावेल आणि शहरातील वैद्यकीय यंत्रणेवर अतिरीक्त ताण येणार नाही, असे काटे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like