Pimpri: शहरातील कचरा संकलन आणि वहन महिनाभर लांबणीवर!

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून नेण्याचे काम दिलेल्या नवीन कंत्राटदाराला काम सुरु करण्यास आणखीन एक महिना मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन कंत्राटदारामार्फत 1 जुनपासून काम सुरु केले जाणार होते. तथापि, वाहने उपलब्ध झाली नसल्याने काम सुरु करण्यास त्यांना एक महिना मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार नवीन कंत्राटदार आता 1 जुलैपासून काम सुरु करणार आहेत. त्यामुळे कचरा संकलन आणि वहनाचे काम एक महिना लांबणीवर गेले आहे.

कचरा संकलन,वहना आणि नवीन कंत्राटाबाबत स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी आज (मंगळवारी) आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, आशादेवी दुरगुडे, आशा राऊत, स्मिता झगडे, संदीप खोत, कंत्राटदार बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड आणि ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांच्या प्रतिनिधींसह सर्व क्षेत्रीय कार्यालयातील सहाय्यक आरोग्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

  • शहरातील कचरा संकलन आणि वाहून नेण्याचे काम 12 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या स्थायी समितीत उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना 21 कोटी 56 लाख आणि दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स 22 कोटी 12 लाख रुपयांमध्ये देण्याचा ठराव संमत करण्यात आला. त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी महापालिकेने दोन्ही कंत्राटदारांना कामाची वर्क ऑर्डर दिली होती. तथापि, ठेकेदारांनी अद्याप काम सुरु केले नाही.

दोन्ही ठेकेदारांना 1 जूनपासून काम सुरु करण्याचे सांगितले होते. परंतु, ठेकेदारांकडे कचरा संकलन करण्यासाठी नवीन वाहने उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे त्यांनी जुन्या वाहनांसहच काम सुरु करण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, महापालिकेने नवीन वाहनांसह 1 जुलैपासूनच काम सुरु करण्याचे निर्देश ठेकेदारांना दिले आहेत.

  • स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहराचे विभाजन करुन दोन भागात कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. उत्तर भागाचे काम बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना आणि दक्षिण भागाचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंत्राटदारांना दिले आहे.

दोन्ही कंत्राटदारांना 1 जून पासून काम सुरु करण्यास सांगितले होते. परंतु, कचरा वहन आणि संकलनासाठी लागणारी 50 टक्केच वाहने कंत्राटदारांकडे उपलब्ध झाली आहेत. कचरा संकलनासाठी दोन क्युबिक मीटरचे 40 टीपर, तीन क्युबिक मीटरचे 70 टीपर, 36 ढकलगाडी (पुष्कार्ड), 13 कॉम्प्कर्ट, 8 ट्रकची आवश्यकता आहे.

  • दोन्ही ठेकेदारांकडे 100 टक्के वाहने उपलब्ध झाली नाहीत. ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंत्राटदाराकडे 50 टक्के तर बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड या कंत्राटदाराकडे 45 टक्के गाड्या तयार आहेत. त्या वाहनांचे पासिंग झाले नाही. पासिंगची अडचण आहे.

आरटीओकडून पासिंगला 15 दिवसाचा कालावधी लागेल. त्यामुळे जुनी वाहने घेऊन काम करण्याची तयारी कंत्राटदारांनी दर्शविली होती. त्यामुळे महापालिकेचे नुकसान होणार होते. त्यासाठी नवीन वाहनांसहच काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी त्यांना एक महिना मुदतवाढ दिली असून आता संपूर्ण नवीन वाहनांसह 1 जुलैपासून दोन्ही कंत्राटदार कचरा संकलन आणि वहनाचे काम सुरु करणार आहेत. तसेच कंत्राटदारांचा ‘मायक्रो’ प्लॅन मंजुर केला असल्याचेही मडिगेरी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.