Pimpri : सामान्य माणूस हा असामान्यपणाकडे वाटचाल करू शकतो – औदुंबर बुधावले-पाटील 

एमपीसी  न्यूज – “स्थितप्रज्ञपणे अनुभवलेले सुख-दुःख, संयम, शौर्य, ऊर्मी आणि सातत्याने ध्येयाचा घेतलेला ध्यास यातूनच महापुरुषांची चरित्रे घडतात.अंतर्मुख होऊन आपल्या आयुष्याकडे डोळसपणे पाहिले; तर सामान्य माणूस हा असामान्यपणाकडे वाटचाल करू शकतो!” असे  मत  सोलापूर ग्रामीण भागातील पोलीसपाटील आणि युवा व्याख्याते औदुंबर बुधावले-पाटील यांनी चिखली येथे व्यक्त केले.
श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठान आयोजित चार दिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत ‘चरित्र अशी घडतात!’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना बुधावले-पाटील बोलत होते. महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक केशव घोळवे, नगरसेवक विलास मडिगेरी, योगिराज पतसंस्था संचालक अनिल खैरे  आदी उपस्थित होते. सोळाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे औपचारिक उद्घाटन करताना महापौर राहुल जाधव म्हणाले की, “या कलियुगात भरकटत चाललेल्या समाजाला व्याख्यानमालेच्या माध्यमातून प्रबोधन करून योग्य मार्गावर आणता येऊ शकते!”

अनिल खैरे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. श्री स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष रामराजे बेंबडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रतिष्ठानाने सोळा वर्षांच्या कालावधीत राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
औदुंबर बुधावले-पाटील म्हणाले की, “प्रत्येक माणसाला स्वतःचे एक चरित्र असते; पण घाव, वेदना सोसून आपल्या अंगभूत क्षमतांचा योग्य वापर करीत आपण जगत असताना जो समाजालाही घडवतो त्याचे चरित्र असामान्य ठरते. ज्याप्रमाणे एखादे छोटे बीज स्वतःला जमिनीत गाडून घेते; पण कालांतराने त्याचा महावृक्ष होतो; तसेच चरित्रवान माणसांबाबत घडत असते. तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय यांचे जीवन ध्यासातून घडले. छळ आणि अवहेलना सोसून ज्ञानेश्वर माउली संतपदाला पोहचले. अराजकतेच्या विरोधात चीड निर्माण झाल्यावर जिजाऊ माँसाहेबांचे चरित्र साकार झाले. ज्याला लहानपणी अनेक प्रश्न पडायचे तो नरेंद्र रामकृष्ण परमहंसांच्या सान्निध्यात स्वामी विवेकानंद झाला. पत्नीने केलेल्या असीम त्यागामुळे महात्मा गांधी, महात्मा फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चरित्रे घडलीत. पुंडलिकाने आपले अवघे आयुष्य आई-वडिलांच्या चरणी समर्पित केले म्हणून भक्त पुंडलिक हा देवाइतकाच वंदनीय झाला. रस्त्याच्या कडेला पडलेला कुष्ठरोगी पाहून बाबा आमटे यांना आपल्या जगण्याचे ध्येय मिळाले. खलील जिब्रान बालपणीच्या प्रसंगातून महाकवी झाला. कॉर्व्हर चिकित्सेतून कृषिशास्त्रज्ञ झाला. आपला मित्र श्वानदंशामुळे मृत्युमुखी पडल्याचे पाहून लुई पाश्चरने प्रतिबंधक लस शोधून काढली आणि आपल्या जगण्याचे सार्थक केले. राजर्षि शाहू महाराजांच्या सहवासात कर्मवीर भाऊराव पाटील अंतर्बाह्य बदलले. आचार्य अत्रे यांच्या जीवनात निर्भयतेला मोठे स्थान होते. त्यामुळे अनेक प्रसंगी त्यांनी हजरजबाबीपणातून आपल्या विरोधकांवर मात केली. एखाद्या लहान मुलाच्या निरागसतेने अन् कुतूहलाने जीवनाकडे पाहिल्याने पु.ल.देशपांडे यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडले. शाळेत व्याकरणाची चूक झाल्याने पुढे जागरूकतेने शब्दांचा शोध आणि बोध घेतल्याने प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्यासारखा वक्ता निर्माण झाला.
पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक दाखले देत; कविता, सुविचार, सुभाषिते उद्धृत करीत आणि किस्से-विनोद सांगत बुधावले-पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून विषयाचे विवेचन केले.व्याख्यानापूर्वी, सोहम म्युझिकच्या कलावंतांनी सुश्राव्य भक्तिगीतांचे सादरीकरण केले. सुनील पंडित, शंकरराव बनकर, पंढरीनाथ म्हस्के, राजेश चिट्टे, महेश मांडवकर, देविदास आदलिंगे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. अविनाश आवटे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष ठाकूर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.