Talegaon News: युरोपसारखा वैज्ञानिक दृष्टिकोन असता, तर आज हिंदुस्थानचे चित्र वेगळे असते : प्रा. डॉ. लहू गायकवाड

स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे उद्घाटन

एमपीसी न्यूज – लढायांचा इतिहास हा मरणापर्यंत येऊन थांबतो. याचाच धडा इतिहासावरून मिळतो. परकियांनी देवदेवतांची मंदिरे लुटताना हिंदुस्थानातील नागरिकांमधील अंधश्रद्धांचा गैरफायदा घेतला. युरोपसारखा वैज्ञानिक दृष्टिकोन असता, तर आज हिंदुस्थानचे चित्र वेगळे असते, असे प्रतिपादन इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक व व्याख्याते प्रा. डॉ. लहू गायकवाड यांनी केले.

तळेगाव दाभाडे येथील मावळभूषण मामासाहेब खांडगे सभागृहात श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्तपणे आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे उद्घाटन इंद्रायणी औद्योगिक सहकारी सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांच्या हस्ते झाले. ‘शिवपूर्वकालीन भारत आणि आक्रमकांच्या लढायांचा इतिहास’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना प्रा. डॉ. गायकवाड बोलत होते.

यावेळी श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक संतोष खांडगे, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्ष सुमती निलवे, बाळासाहेब शिंदे, दादासाहेब उऱ्हे, मिलिंद शेलार, कैलास काळे, सुदाम दाभाडे, शंकर हदिमणी, प्रविण भोसले, पांडुरंग पोटे, विल्सेन्ट सालेर, सचिन कोळवणकर, विलास भेगडे, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. डॉ. लहू गायकवाड पुढे बोलताना म्हणाले, की अगदी महाभारतापासून विचार केला तर लक्षात येते की लढायांमुळे महाराजे अंतर्बाह्य बदलून गेले. काहींनी केवळ सत्ता संपत्ती मिळविण्यासाठी लढायांचे तंत्र अवलंबले. तर काही महाराजे रयतेच्या संरक्षणासाठी लढायांना सामोरे गेल्याचा इतिहास आहे. युद्धानंतरची मन हेलवणारी परिस्थिती पाहून सम्राट अशोकाचीही अवस्था ‘युद्ध नको, बुद्ध हवा’ अशी झाली होती. सम्राट अशोकाने आपल्या संपूर्ण संपत्तीचा त्याग करून अहिंसेचा मार्ग दाखवला. अहिंसेचा विचार खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाने मांडला. युद्ध कधीच चांगले नसल्याने ते टाळण्यासाठीच श्रीकृष्णाने शिष्टाई केली होती.  सिकंदर भारतातून जाताना इथले स्वयंपाकशास्त्र (रेसिपीज) घेऊन गेला. संपत्तीपेक्षा त्याला ही गोष्ट महत्त्वाची वाटली. महंमद घुरी, बाबर यांनी मात्र संपत्ती, लयलूट करण्यासाठीच लढाया केल्या.

पृथ्वीराज चौहान, हर्षवर्धन यांचा दृष्टिकोन हा सर्व धर्मातील जे जे चांगले आहे, त्याचा स्वीकार करण्याचा होता. सकारात्मकता होती. कुणीतरी सकारात्मक सुरुवात केली, तरच वेगळा इतिहास घडेल, असेच विचार या राजांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी लढायांबाबत वेगळे शास्त्र निर्माण केले होते. त्यामुळेच त्यांचे प्रशासकीय धोरण, व्यवस्थापन या गोष्टींचा संपूर्ण जगाने स्वीकार केला. आपली दृष्टी व दृष्टिकोन यावरच जगात शांतता नांदण्यास मदत होईल, असेही डॉ. गायकवाड यांनी सांगितले.

नंदकुमार शेलार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्याख्यानमालेच्या आयोजनातील सातत्याबद्दल गौरवोद्गार काढले.

प्रास्ताविक करताना संतोष खांडगे यांनी सांगितले, की इतिहासाची संकल्पना विस्तारावी या उद्देशाने राष्ट्रपुरुष, राष्ट्रसंत असे एकाच धाटणीचे विषय निवडून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. विषयांमध्ये सुसंगतता असेल, तर विद्यार्थ्यांना आपला इतिहास समजण्यास मदत होते.

सूत्रसंचालन कुसुम वाळुंज व लक्ष्मण मखर यांनी, तर प्रविण भोसले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.