Pimpri: ‘वायसीएमएच’ची अवस्था दयनीय; प्रशासन, सत्ताधा-यांचे दुर्लक्ष

नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) औषधांचा तुटवडा जाणवत आहे. भांडार विभागाकडून औषधांची खरेदी करण्यात विलंब होत आहे. तसेच 60 कंत्राटी परिचारिकांची मुदत संपल्याने कर्मचा-यांची मोठी कमतरता भासत आहे. त्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत असून याकडे महापालिका प्रशासन आणि सत्ताधा-यांचे साफ दुर्लक्ष होत आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी केला आहे. औषधांच्या तुटवड्याबाबत त्वरीत उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

महापालिकेच्या वायसीएमएच रुग्णालयामध्ये अल्प दरात उपचार होत असल्यामुळे गोरगरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात उपचारासाठी गर्दी होते. रुग्णालयात आल्यानंतर चांगले उपचार मिळेल, अशी रुग्णांमध्ये आशा असते; मात्र औषधांचा नेहमीचाच तुटवडा आणि डॉक्टर्स आणि नर्सेसची कमतरता. यामुळे रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत.

  • रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण पाहता डॉक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचा-यांचा अनेक महिन्यांपासून तुटवडा आहे. त्यातच कंत्राटी पद्धतीवरील 60 महिला परिचारिकांची मुदत संपली असून सध्या 70 नर्सेसची कमतरता आहे.

महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये नेहमीच औषधांचा साठा अपुरा पडतो. औषधे मिळत नसल्यामुळे रुग्णांना खासगी मेडिकलमधून औषधे आणायला लावली जात आहेत. त्यामुळे खासगी औषधविक्रेत्यांचे खिसे भरण्यासाठी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी जाणीवपूर्वक रुग्णांना औषधे उपलब्ध करून देत नसल्याचा आरोपही नागरिक करीत आहेत. परिणामी, महापालिकेच्या या उदासीन कारभारामुळे रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दड सहन करावा लागत आहे, असेही नगरसेविका शिलवंत यांनी म्हटले आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.