Pimpri: महासभा तहकुबीचे ग्रहण संपेना; जुलै महिन्याची सलग पाचव्यांदा तर ऑगस्टची दुस-यांदा सभा तहकूब

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता असतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप पदाधिका-यांनी महासभा तहकूब करण्याचा सपाटा कायम ठेवला आहे. गेल्या सव्वा दोन वर्षात तब्बल 48 वेळा सभा तहकूब करणा-या सत्ताधा-यांनी जुलै महिन्याची सलग पाचव्यांदा आणि ऑगस्टची दुस-यांदा महासभा तहकूब केली आहे. त्यामुळे अनेक प्रस्ताव रखडले आहेत. आता जुलै आणि ऑगस्टच्या दोन्ही सभा 3 सप्टेंबर रोजी आयोजित केल्या आहेत. दरम्यान, विरोधात असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेने देखील सभा लांबणीवर टाकण्यास कोणताही विरोध केला नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे.

जुलै आणि ऑगस्टच्या दोन्ही बुधवारी (दि. 21) आयोजित केल्या होत्या. या सभेत शहरातील विस्तळीत पाणीपुरवठ्यावर तब्बल साडेसात तास चर्चा झाली. विषयपत्रिकेवरील एकाही विषयावर चर्चा झाली नाही. त्यामुळे या दोन्ही महासभा आज किंवा उद्या घेणे अपेक्षित होते. परंतु, भाजप सत्ताधा-यांनी तसे न करता दोन्ही महासभा तब्बल 13 दिवस लांबणीवर टाकल्या. सप्टेंबरमध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता असतानाही सभा लांबणीवर टाकल्या आहेत. आता या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या दोन्ही महासभा 3 सप्टेंबर रोजी आयोजित केल्या आहेत.

मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्याचे आयुध वापरून सत्ताधारी वारंवार महासभा तहकूब करत आहेत. या वेळेच्या अपव्ययाबरोबरच शहर विकासाला प्रतिरोध झाला आहे. जुलै महिन्यात शहरातील कच-याचा प्रश्न गहन झाला होता. शहरात सर्वत्र कच-याचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे सत्ताधा-यांनी कच-यावरील चर्चा टाळण्यासाठी कचरा समस्या सुटेपर्यंत महासभाच होऊ दिली नाही. जुलै महिन्याची महासभा सलग पाचवेळा तहकूब केली. कच-याचा प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळेच महासभा पुढे ढकलली जात होती, असा घरचा आहेर उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी दिला आहे.

विरोधकांची भूमिका संशायस्पद!
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे विरोधकांच्या भूमिकेत आहेत. महासभा सातत्याने तहकूब केली जात असताना विरोधकांना त्यांचे काही देणे-घेणे राहिले नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असतानाही जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या दोन्ही महासभा तब्बल 13 दिवस लांबणीवर टाकल्या. त्याला विरोधकांनी साधा आक्षेप देखील घेतला नाही. त्यामुळे विरोधकांच्या भूमिकेबाबक संशय निर्माण झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.