Pimpri: महापालिका आयुक्त भाजप कार्यालयात; राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे कारवाई करण्याची मागणी

राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांची भाजप कार्यालयात भेट घेऊन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शिष्टाचाराचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविले आहे. त्यात नगरसेवक कलाटे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्त राजकीय पक्षाच्या कार्यालयात गेले आहेत. यामुळे आयुक्त हर्डीकर हे भाजपचेच हस्तक असल्याचे सिद्ध होते. महापालिका मुख्यालयात पालकमंत्र्यांनी येणे अपेक्षित असताना स्वत: आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांची ‘सरबराई’ केली. शिष्टाचाराप्रमाणे गैरपक्षीय ठिकाणी आयुक्तांनी पालकमंत्र्यांचे स्वागत करणे अपेक्षित असते. परंतु, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांशी बंद दाराआड ‘गुप्तचर्चा’ केली.

  • महापालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात एकाही आयुक्ताने सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांचे स्वागत केले नाही. मात्र, विद्यमान आयुक्त श्रावण हर्डीकर त्याला अपवाद ठरले आहेत. त्यामुळे या आधी त्यांच्यावर भाजपचे प्रवक्ते, दलाल, असे आरोप करण्यात आले होते, ते आजच्या घटनेवरुन सिध्द झाले आहे.

तीन वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी एका खासगी हॉटेलमध्ये महापालिकेच्या अंदाजपत्रकाबाबत माहिती देण्यासाठी नगरसदस्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावेळी फडणवीस यांनी जाधव यांची तातडीने बदली केली होती. त्याच न्यायाने आजच्या या घटनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली करावी, अशी मागणी कलाटे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.