Pimpri: मेट्रो स्टेशनचे काम ठप्प; ठेकेदारांकडून काम काढले; महामेट्रोची कारवाई

नवीन टेंडर काढणार; 'त्या' कंपन्यांनी सुमारे 100 कामगारांचा थकवला होता पाच महिन्यांचा पगार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स येथे सुरु असलेले मेट्रो स्टेशनचे काम रखडल्याने पुणे महामेट्रोने एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्‍ट प्रा. लि या कंपनीचा ठेका रद्द केला आहे. त्यांच्याकडून कामाचा ठेका काढून घेत त्यांच्यावर कारवाई केली. तर, रिच वनमधील पाच स्टेशनचे काम सध्या या कंपनीकडे आहेत. या कामाची प्रगती पाहून त्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे मेट्रो रिच वनचे प्रकल्प व्यवस्थापक गौतम बि-हाडे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे महामेट्रोचे काम वेगाने सुरू असताना त्याअंतर्गत बांधण्यात येणा-या मेट्रो स्थानकांचे काम मात्र बंद पडले आहे. मेट्रोने ठेका दिलेल्या कंपन्यांनी सुमारे 100 कामगारांचे पगार पाच महिने थकवल्याने ही परिस्थिती एप्रिल महिन्यात उद्‌भवली. महामेट्रोने दोन्ही कंपन्यांना नोटीस बजावली.

  • महामेट्रोच्या वतीने पिंपरी ते दापोडी दरम्यान पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. दुस-या टप्प्यात पिंपरी ते निगडी दरम्यान मेट्रोचे काम होणार आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात दापोडी, कासारवाडी, संत तुकारामनगर, पिंपरी आणि एम्यायर इस्टेट (मोरवाडी) अशा पाच ठिकाणी मेट्रो स्थानके होणार आहेत. तर, दुस-या टप्प्यात चिंचवड, आकुर्डी आणि निगडी या तीन ठिकाणी स्थानकांचे नियोजन आहे.

पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स येथे मेट्रो स्टेशनचे काम सुरु असून हे काम महामेट्रोने मे.एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्‍ट प्रा. लि. या कंपनीला दिले होते. या कंपनीकडून विविध विभागात शंभर कामगार काम करत होते. या कामगारांचे डिसेंबर 2018 ते एप्रिल या पाच महिन्यांचे वेतन थकविले होते. काम बंद करीत या कामगारांनी उपोषणाचे हत्यार उपसले आणि स्टेशनचे कामही ठप्प झाले. त्यांनतर हा प्रकार उघडकीस आला.

  • याप्रकरणी गंभीर दखल घेत महामेट्रोने मे.एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्‍ट प्रा. लि कंपनीकडून पिंपरी, संत तुकारामनगर, फुगेवाडी आणि दापोडी या चार स्टेशनच्या कामाचा ठेका काढून घेतला आहे. मात्र, रिच वनमधील नाशिकफाटा, कासारवाडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल्स या पाच स्टेशनचे काम सध्या त्यांच्याकडे आहे. या कामाची प्रगती पाहून त्याबाबतचा विचार केला जाणार आहे.

मेट्रो रिच वनचे प्रकल्प व्यवस्थापक गौतम बि-हाडे म्हणाले, कामगारांचे थकवलेले पगार आणि संथगतीने सुरू असलेल्या कामासंदर्भात मेट्रोने या कंपन्यांना अंतिम नोटीस बजावली होती. त्यानंतरही फारसा बदल न झाल्याने महामेट्रोने मे.एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्‍ट प्रा. लि कंपनीकडून पिंपरी, संत तुकारामनगर, फुगेवाडी आणि दापोडी या चार स्टेशनच्या कामाचा ठेका काढून घेतला आहे. आता स्टेशनच्या कामासाठी नवीन टेंडर काढण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.