Pimpri : हिंजवडीसह पुण्यातील सर्व आय.टी. पार्कमध्ये सुलभ शौचालय बांधावे -‘एनआयटीइएस’ची मागणी

एमपीसी न्यूज – आय.टी. पार्कमध्ये अनेक आरक्षित भूखंड शिल्लक आहेत. त्यामुळे हिंजवडीसह पुण्यातील आय.टी. पार्कमध्ये आरक्षित जागेवर सुलभ शौचालय बांधावे, अशी मागणी राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कामगार सेना (एनआयटीइएस) या युनियनने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच याकडे पीएमआरडीए आणि एमआईडीसीनेसुद्धा लक्ष देऊन काम पूर्ण करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कामगार सेना (National Information Technology Employees Sena-NITES) हि युनियन संपूर्ण भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये (आय.टी. पार्कमध्ये) काम करणाऱ्या कामगारांचे कायदेशीर हित जोपासण्यासाठी व कामगारांच्या विविध समस्या ह्यांचे निवारण करण्यासाठी तसेच ह्या क्षेत्राच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली ट्रेड युनियन आहे. या युनियनने हिंजवडी, पुणे येथील सर्व फेझमधील आय.टी. पार्कमध्ये प्रत्येकी एक स्वच्छ, दुर्गंधीमुक्त, आरोग्यकारक सुलभ शौचालय बांधावे, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील हिंजवडी, पुणे येथील ह्या पंचतारांकित आय.टी.पार्कमध्ये सुमारे 126 लहान मोठ्या कंपन्या आहेत. दररोज हजारो नागरिक रोजगार-धंदा आणि इतर कार्यांसाठी ह्या क्षेत्रात ये-जा करीत असतात. ह्या हजारो नागरिकांना ह्या क्षेत्रात वावरताना सुलभ शौचालय नसल्याने अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. ह्या अशा समस्येमुळे महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक व अपंग ह्यांना संकुचित त्रास होत आहे. अशातच ह्या नागरिकांना ह्या क्षेत्रातील हॉटेल व मॉलमधील शौचालय ह्याचा वापर करण्याशिवाय पर्याय राहत नाही.

या क्षेत्रातील हॉटेल व मॉलमधील शौचालय ह्याचा वापर करण्यात सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. मागील काही महिन्यात हिंजवडी येतील काही हॉटेल आणि मॉलमधील शौचालयमध्ये छुपे कॅमेरा रेकॉर्डिंग करण्यासाठी लावल्याचे आढळले होते. त्यामुळे महिलावर्ग इत्यादी ह्यांना या क्षेत्रातील हॉटेल व मॉलमधील शौचालय ह्याचा वापर करण्यास भीती वाटत आहे.

एकीकडे भारत सरकार स्वच्छ भारत अभियानासाठी करोडो रूपये खर्च करीत आहे. ‘घर तेथे शौचालय’ अशी संकल्पना गावोगावी राबवण्यात येत आहे. मात्र, ह्याच आय. टी. क्षेत्रात एकही सुलभ शौचालय नसल्याने ह्या स्वच्छता अभियानाची पूर्तता होत नाही, असे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आय.टी. पार्कमध्ये एक योग्य, स्वच्छ, दुर्गंधीमुक्त, आरोग्यकारक सुलभ शौचालय बांधावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.