Pimpri : परस्पर महागडी चार वाहने विकून व्यावसायिकाची पावणेचार कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज – व्यावसायिकाला आर्थिक अडचण असल्याने त्याने त्याच्याकडील महागडी चार वाहने विकायचे असल्याचे सांगितले. एका मध्यस्थी इसमाने त्यांना 3 कोटी 80 लाख रुपयांना चार वाहने विकून देतो असे आमिष दाखवले. मध्यस्थीने चार वाहने परस्पर विकली आणि संपूर्ण रकमेचा अपहार केला. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी विनय विवेक आरान्हा (वय 45, रा. नेपीयर रोड, कॅम्प, पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सागर मारुती सूर्यवंशी (वय 38, रा. साऊथ मेन रोड, कोरेगाव पार्क, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनय हे व्यावसायिक आहेत. त्यांना 2015 साली आर्थिक अडचण होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या फॉर्च्यूनर (एमएच 12/ जेके 0001), बँटली (एमएच 06 / एएल 3699), मर्सिडीज बेंझ एसएलएस रोडस्टर (जेएच 05 / बीएफ 0025) आणि बीएमडब्ल्यू एम 5 (एमएच 14 / डीझेड 0005) ही चार महागडी वाहने विकण्याचे ठरवले. त्याबाबत त्यांनी आरोपी सागर याला सांगितले. सागर याने ही चार वाहने 3 कोटी 80 लाख रुपयांना विकून देतो, असे सांगितले.

सागर याने चारही वाहने विनय यांच्याकडून ताब्यात घेतली. ती वाहने आरोपीने परस्पर विकून आलेल्या पैशांचा अपहार केला. फिर्यादी यांना त्यातील एकही वाहन अथवा पैसे न देता विनय यांची फसवणूक केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक निकम याचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.