Pimpri: पिंपरी विधानसभेची जागा मिळू नये यासाठीच ‘त्या’ वाक्याचा विपर्यास – रामदास आठवले

आठवले यांची पुन्हा दिलगिरी

एमपीसी न्यूज – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. आजच्या तरुणाईबद्दल भाष्य करण्यासाठी केलेल्या विडंबनात्मक काव्याचा विपर्यास करून काही मंडळींनी मातंग आणि बौद्ध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभेची जागा आरपीआयला देण्यासंदर्भात चर्चा सुरु असून पिंपरीची जागा आरपीआयला मिळू नये, यासाठीच काही धर्मांध शक्तींनी माझ्या वाक्याचा विपर्यास केल्याचे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पिंपरी-चिंचवडच्या कार्यक्रमात आठवले यांच्याकडून अण्णा भाऊंचा अनादर झाल्याचे पसरवले गेले होते. त्यानंतर रामदास आठवले यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. मात्र, त्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) सकाळी रामदास आठवले आणि मातंग समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांची नवीन विश्रामगृहात संयुक्त बैठक झाली. त्यावेळी आठवले बोलत होते.

  • यावेळी मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक रमेश बागवे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक अविनाश बागवे, स्वाती लोखंडे, भगवानराव वैराट, रमेश राक्षे, अंकल सोनावणे, अशोक लोखंडे, प्रकाश जगताप, संदीपान झोंबाडे, भाऊसाहेब अडागळे, दलित महासंघाचे आनंद वैराट, वंचित आघाडीचे गणेश जाधव, लहुजी संघर्ष सेनेचे विकास सातारकर यांच्यासह ‘आरपीआय’चे शहराध्यक्ष अशोक कांबळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, महिला आघाडीच्या सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, पश्चिम आघाडीचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे अयुब शेख, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, सचिव बाबुराव घाडगे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

माझ्या अनावधाने केलेल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील. तर, दिलगिरी व्यक्त करतो. सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या मजकुरावर मातंग आणि बौद्ध समाजाने अवलंबून न राहता सामाजिक एकोपा जपावा, असे आवाहन करत रामदास आठवले म्हणाले, “अण्णाभाऊ यांच्याबद्दल नेहमीच आदर आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना भारतरत्न मिळावा, यासाठी संसदेत मागणी करणार आहे. त्यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यामुळे मातंग समाजाने गैरसमज करून घेऊ नये.

  • त्यांच्या कवितेचा आधार घेत तरुणांवर भाष्य करताना यमक जुळविण्याच्या ओघात तसे बोललो होतो. आपण कायम मातंग समाजाच्या बरोबर असून, दोन्ही समाजाने भावाप्रमाणे राहिले पाहिजे. पक्ष आणि संघटना बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी एकत्र या. पूर्वी हजारो-लाखोंचे मेळावे भरायचे. सामाजिक सलोखा जपून समाजहितासाठी तसा एखादा महामेळावा आयोजित करावा, असेही ते म्हणाले.

रमेश बागवे म्हणाले, “आठवले यांच्या विधानाचा विपर्यास करीत समाजातील काही तरुणांनी त्यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली. त्याबद्दल समाजाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. जातीपातीच्या पलीकडे जाऊन रामदास आठवले समाजासाठी काम करत आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना बळी न पडत मातंग आणि बौद्धांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे.

  • भगवान वैराट म्हणाले, “समाजातील एकी फोडण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. आठवलेंच्या रूपाने आपला समाज संसदेत प्रतिनिधित्व करीत आहे. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यासाठी आठवले यांनी संसदेत आवाज उठवावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.