Pimpri: लघुउद्योग, व्यावसायिक मिळकतींचा तीन महिन्याचा कर माफ करा; सत्ताधाऱ्यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील लघुउद्योग, व्यवसाय दोन महिने बंद होते. त्याचा या व्यवसायिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील लघुउद्योग आणि बिगरनिवासी (कमर्शियल) मिळकतींचा तीन महिन्याचा मिळकतकर माफ करावा, अशी सूचना सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी   कोरोनाचा आढावा तसेच शहरात करण्यात येणाऱ्या विकासकामांसंदर्भात  महापालिकेत नुकतीच बैठक घेतली. यावेळी महापौर उषा ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, नगररचना उपसंचालक रा. म. पवार आदी उपस्थित होते.

लॉकडाऊनच्या कालावधीत शहरातील सर्वच उद्योगधंदे बंद असल्याने लघुउद्योजकांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. या नुकसानीतून बाहेर येण्यासाठी त्यांना बराच कालावधी लागणार आहे. ही बाब विचारात घेऊन महापालिका हद्दीतील सर्व लघुउद्योगांचा व बिगनिवासी (कमर्शियल) मिळकतींचा तीन महिन्यांचा मिळकतकर माफ करण्याची सूचना दोन्ही आमदारांनी केली आहे.

शहरातील आनंदनगर, भाटनगर यांसारख्या झोपडपट्टी भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या दोन्ही ठिकाणी मुंबईतील धारावीसारखी परिस्थिती निर्माण होवू नये, यासाठी वेळीच तातडीने योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.

यासाठी वेळ पडल्यास इन्स्टीटयूशनल क्वारंटाईनसाठी महापालिका शाळा इमारतींचा वापर करुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासही दोन्ही आमदारांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून महापालिका स्तरावरही स्वदेशी वस्तू वापराबाबत अंमलबजावणी करण्यात यावी.

कासारवाडी येथील हॉटेल कलासागरजवळ आणि  चिखली येथील नाल्याजवळ एसटीपी प्रकल्प उभारण्याची सूचनाही दोन्ही आमदारांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.