Pimpri: कचरा समस्या निर्माण करणारेच कच-याची पाहणी करतात तेव्हा…. ?- विरोधकांचा सवाल

भाजप तीन वर्षात कच-याची समस्या मार्गी लावू शकले नाही; जुनी निविदा मंजूर करून घातला घोळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा संकलन आणि वहनाच्या कंत्राटात ‘खाबुगिरी’चे आरोप होत असतानाच सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी आज (गुरुवारी) अधिका-यांना सोबत घेऊन कचरा समस्येची पाहणी केली. कच-याचे साचलेले ढिग पाहून पदाधिकारी अवाक झाले. अखेरीस कचरा समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आदेश दिले. तर, कचरा समस्या निर्माण करायची आणि स्वत:च पाहणी करायची, तीन वर्षात भाजप कच-याची समस्या मार्गी लावू शकले नाहीत, अशी टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

सत्ताधारी भाजपने शहरातील घरोघरचा कचरा संकलन आणि वहनाची निविदा प्रक्रियेचा दोन वर्षा घोळ सुरु ठेवला. पहिल्या स्थायी समितीने अखेरच्या सभेत शहराच्या दक्षिण विभागाचे काम ए. जी. इन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्टस आणि उत्तर विभागाचे काम बीव्हीजी इंडिया या दोन कंत्राटदारांना दिले. त्यानंतर दुस-या स्थायी समितीने निविदा रद्द, फेरनिविदा, पुन्हा जुनी निविदा मंजूर असा घोळ घातला. तिस-या स्थायी समितीने कामाचे आदेश देण्यास तीन महिने विलंब केला. यामध्ये मोठा ‘गोलमाल’ झाल्याचा आरोप केला जात आहे.

  • अखेर 1 जुलैपासून नवीन कंत्राटदारांमार्फत कचरा संकलन आणि वहनाचे काम सुरु केले. मात्र, शहरात कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. कचरा समस्या गंभीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेने सत्ताधारी भाजपला ‘घेरले’ आहे. भाजपच्या पक्षाच्या बैठकीत देखील कचरा समस्येचे पडसाद उमटले. महापालिकेने स्वत:च्या मालकीच्या 50 गाड्या आणि 50 चालक मोफत कंत्राटदाराला देऊ केल्या आहेत. त्यातच स्वपक्षाच्या नगरसेवकाने देखील आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने भाजप पदाधिका-यांना रस्त्यावर उतरावे लागले.

वाकड, पिंपळेनिलख परिसराची पाहणी केली. या दौ-यावेळी प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी विजय खोराटे, स्मिता झगडे अनुउपस्थित होते. त्यामुळे हा दौरा केवळ ‘फार्स’ ठरण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, आगामी चार दिवसात कच-याची समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. महासभेत कच-याचे पडसाद उमटू नयेत, याची सत्ताधारी पुरेपूर काळजी घेत आहेत.

विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, ”शहरातील कच-याची समस्या सत्ताधारी भाजपनेच निर्माण केली आहे. निविदेत मोठ्या प्रमाणात ‘खाबुगिरी’ झाली आहे. चो-या यांनीच करायच्या आणि शिरजोरीही यांनीच करायची. भाजपने कच-याच्या निविदेचा घोळ सव्वा दोन वर्ष सुरु ठेवला. सत्ताधा-यांच्या एकमेकांची ‘अडवा आणि जिरवा’ या भूमिकेत शहरातील करदाते वेठीस धरले जात आहेत. निष्क्रिय सत्ताधा-यांना तीन वर्षांत शहरातील साधा कचरा उचलता आला नाही. तर, हे जनतेची काय सेवा करणार आहेत?. कचरागाड्यांची उंची जास्त असल्याने महिलांना गाड्यात कचरा टाकता येत नाहीत. सत्ताधारी नागरिकांना वेठीस धरत आहेत. कोणाचे कोणावर नियंत्रण राहिले नाही. भाजपने शहराची वाट लावून टाकली आहे”, अशी टीकाही त्यांनी केली.

  • महापौर राहुल जाधव यांनी क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षकांची बैठक घेतली. शहरात कचरा संकलन योग्य प्रकारे होत नाही. शहराचा मोशी कचरा डेपो होऊ देणार नाही. कचरा संकलन व वहनासाठी नवीन गाड्या घेऊन देखील त्याचा उपयोग होत नाही. कचरा उचलण्यासाठी जेवढ्या गाड्या अपेक्षित आहेत. तेवढ्या गाड्या कंत्राटदाराकडून मागून घेण्यात याव्यात. गाड्या न दिल्यास आम्हाला लेखी कळविण्यात यावे. कंत्राटदावर कारवाई केली जाईल. आरोग्य निरीक्षकांनी जबाबदारी झटकली. तर, कडक कारवाई केली जाईल. शहराची अचानक पाहणी करणार आणि कचरा आढळल्यास आरोग्य निरीक्षकांवर करणार आहे. त्यामुळे जबाबादारीने काम करण्याचे अधिका-यांना निर्देश दिल्याचे महापौर जाधव यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.