Pimpri : विरोधी पक्षनेतेपदासाठी नाना काटे, जावेद शेख यांच्यात रस्सीखेच

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नवीन विरोधीपक्षनेता कोण असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, जावेद शेख आणि राजू मिसाळ यांच्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच निर्माण झाली आहे. तसेच अजित गव्हाणे यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, याबाबतचा अंतिम निर्णय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने अधिका-अधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या अलिखित ठरलेल्या नियमानुसार विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मंगळवारी (दि. 9) विरोधी पक्षनेतेपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार राजीनामा दिला आहे.

पहिल्यावर्षी पिंपरी मतदारसंघातील योगेश बहल यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली होती. तर, दुस-या वेळी भोसरी मतदारसंघातील चिखलीचे साने यांच्याकडे पद दिले होते. आता चिंचवड मतदारसंघाकडे पद दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात असून तिस-या वेळी कोणाला संधी दिला जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्यावेळी नाना काटे विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रबळ दावेदार होते. परंतु, त्यांच्याऐवजी चिखलीचे दत्ता साने यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा दिली होती. त्यामुळे आता तिस-यावेळी काटे यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. काटे, जावेद शेख आणि राजू मिसाळ यांच्यात विरोधी पक्षनेते पदासाठी रस्सीखेच निर्माण झाली आहे. याशिवाय अजित गव्हाणे, सुलक्षणा धर यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला आहे. पिंपरी आणि चिंचवड या दोनही मतदारसंघातून पार्थ यांनी कमी मते मिळाली. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. तीन महिन्यांनी जनतेसमोर जायचे आहे. त्याची गणिते समोर ठेवूनच पक्षश्रेष्टी विरोधी पक्षनेता निवडतील. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडणारा, चुकीच्या कामाला प्रखर विरोध करणा-या अभ्यासू नगरसेवकाकडे विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सोपविली, जाण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.