Pune : राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – डॉ.नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज -राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरते स्वच्छतागृह आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावेत, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसंबंधी राज्यस्तरीय समितीची आढावा बैठक आज पुणे येथील कौन्सिल हॉल सभागृहात घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी बैठकीसाठी डॉ.प्रदीप व्यास-प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ.दिपक म्हैसेकर-विभागीय आयुक्त पुणे, राजीव जाधव-कामगार आयुक्त, शेखर गायकवाड-साखर आयुक्त, डॉ.अर्चना पाटील-संचालक आरोग्य सेवा, डॉ.अशोक थोरात-जिल्हा शल्यचिकित्सक बीड, डॉ.अनिरुध्द देशपांडे, डॉ.मधुसूदन कर्नाटकी आदी अधिकारी उपस्थित होते.

  • यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, राज्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे. कारखान्याच्या ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत अथवा नाहीत याची माहिती कामगार विभागाने घ्यावी. ज्या ठिकाणी स्वछतागृहे नाहीत अशा ठिकाणी फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच आरोग्य विषयक तक्रारीचे निराकरण करण्यासाठी हंगाम सुरू होण्यापूर्वी नियमितपणे आरोग्य, कामगार विभाग आणि साखर आयुक्तालयाच्या पुढाकारातून ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.