Pune : अतिवृष्टीबाधित भागासाठी कृती आराखडा करून लवकरच कार्यवाही – महापौर

एमपीसी न्यूज – अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाला न्याय देण्याच्या दृष्टीने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पदाधिकारी, महापालिका आयुक्त आणि स्थानिक नगरसेवकांसोबत सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर तातडीने कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती महापौर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक उपस्थित होते. लवकरच बैठक घेऊन कृती आराखड्यासंदर्भात सविस्तर नियोजन केले जाणार आहे. सभागृह नेते धीरज घाटे, महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह पदाधिकारी, खाते प्रमुख अणि स्थानिक नगरसेवक या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले. कात्रजच्या तलावाच्या सांडव्यातून वाहून जाणाऱ्या पाण्याला नैसर्गिकरित्या वहन होण्यासाठी सर्व ठिकाणच्या नाल्यावरचे पूल, कलवड यांची दुरुस्ती करणे, संरक्षण कठडे बसवणे, नाल्याच्या कडेच्या तुटलेल्या जाळ्यात दुरुस्त करून नव्याने बसवणे आदी कामे करावी लागणार असल्याचे या पाहणीदरम्यान समोर आले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर नव्याने झालेल्या बांधकामाचे नाल्यात सोडले जाणारे ड्रेनेजचे पाणी हे ड्रेनेज लाईनला जोडणे आणि संबंधितावर कारवाई करून ही माहिती पीएमआरडीएला कळविली जाणार आहे. नाल्यात आणि नाल्याच्या आजूबाजूला पुरात वाहून आलेल्या गाड्या, कचरा, जनावराचे अवशेष व अतिक्रमण काढून नैसर्गिक प्रवाह मोकळे करणे. पुरामध्ये रोडवर वाहून आलेला राडारोडा, गाड्या, उचलून घेऊन रोड मोकळा करणे. नाल्याचे रुंदीकरण खोलीकरण करणे आणि छोटे कलवडची रुंदी-खोली वाढवणे, या कामांचा समावेश देखील कृती आराखड्यात असणार आहे, असेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.

टांगेवाला कॉलनी येथे असणाऱ्या १५० घरांचे आणि आंबील ओढा येथील घरांचे कायमस्वरूपी पुनर्वसन किंवा एसआरएच्या माध्यमातून कसे राबवता येईल, यावरही आगामी काळात निर्णय होणार आहे. तेथील राहिवाशांचा राहण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवणे. अतिवृष्टीमुळे जीवितहानी व वित्तहानी झालेल्या रहिवाशांचे प्राधान्याने प्रश्न सोडवणे. पुरबाधित झालेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नुकसान भरपाई धोरण प्राधान्याने मिळण्याबाबत पाठपुरावा करणे व त्यांना न्याय देणे, हेही मुद्दे पाहणी दरम्यान पुढे आले. यावेळी शहर अभियंता प्रशांत वाघमारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल, मनसेचे गटनेते वसंत मोरे, माजी महापौर दत्ता धनकवडे, नगरसेवक महेश वाबळे यावेळी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.