Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपची कुरघोडी, पंतप्रधान मोदी पुण्यात येणार अन् पुणे मेट्रो चे उद्घाटन करणार

एमपीसी न्यूज : अवघ्या काही दिवसांनी पुणे महापालिकेचा कालावधी संपणार आहे. परंतु हा कालावधी संपण्याच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार असून ते पुणे मेट्रोचे उद्घाटन करणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा दौरा होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यात पुणे महानगरपालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. तसेच पुणे मेट्रोचे उद्घाटनही नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मेट्रो चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. त्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. त्या वेळी बोलताना त्यांनी पुणे मेट्रोचे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल असं सांगितलं होतं. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार असल्यामुळे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केल्याचे उघड झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काही दिवसांपूर्वी मेट्रोचा पाहणी दौरा केला होता. मेट्रोच्या  अधिकाऱ्यांकडून त्यांनी संपूर्ण प्रकल्पाची माहिती जाणून घेतली होती. त्या वेळी भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीका केली होती. स्थानिक प्रतिनिधी सोडून शरद पवार यांनी मेट्रोची ट्रायल कशासाठी घेतली असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.