Dighi : हॉटेल व्यवस्थापकाला पोलिसांची मारहाण; हवालदारावर अदखलपात्र गुन्हा

एमपीसी न्यूज – पोलीस कर्मचा-यांनी आळंदीतील एका हॉटेल व्यवस्थापकासह कर्मचा-याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीचे ‘सीसीटीव्ही’ फुटेज व्हायरल झाले आहे. याप्रकरणी
हवालदारावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडला. 

महेश खांडे असे अदखलपात्र गुन्हा दाखल केलेल्या पोलीस हवालदराचे नाव आहे. हॉटेल व्यवस्थापक लिंगराज रंगे गौडा (वय 49, रा. हडपसर) यांनी दिघी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर, विशाल शंकर गिरी (वय 22, रा. आळंदी) यांनाही मारहाण झाली आहे.

शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास दिघी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक कदम, पोलीस हवालदार खांडे यांच्यासह इतर तिघेजण आळंदी – पुणे रस्त्यावरील हॉटेल वैभव पॅलेसमध्ये गेले. काऊंटरवर बसलेले व्यवस्थापक लिंगराज गौडा यांच्याशी वाद घालत  त्यांना आतील खोलीत नेऊन मारहाण केली. यात त्यांच्या पोटावर आणि तोंडावर मोठी दुखापत झाली. त्याचबरोबर हॉटेलातील कर्मचारी विशाल गिरी यांनाही लोखंडी पट्टीने मारहाण केली. या प्रकाराची तक्रार देण्यासाठी हॉटेल मालक अवधूत गाढवे (वय-27, रा. स्पाईन रोड, सेक्टर , मोशी) हे दिघी पोलीस ठाण्यात गेले. मात्र, त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करत त्यांच्यावरही अरेरावी केली.

अखेर गाढवे यांनी हा प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला. त्यानंतर सुत्रे फिरली अन् हवालदारावर मारहाण केल्याचा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

दिघी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे म्हणाले, पोलिसांचे पथक रात्रीची गस्त घालत असताना नेहमीप्रमाणे हॉटेलची तपासणीही करतात. त्याच अनुषंगाने पोलीस वैभव पॅलेस हॉटेलात गेले होते. तेथे झालेल्या वादात पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केली. मात्र, पोलिसांनी पैशाची मागणी केली नाही.

दरम्यान, याप्रकरणी सहायक निरीक्षक महेंद्र कदम आणि हवालदार खांडे यांना पोलीस नियंत्रण कक्षाशी संलग्न करून सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत अलसटवार यांच्यामार्फत चौकशी सुरू करण्याचे आदेश पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.