Positive News : केवळ शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून रोझलँड सोसायटी झाली कोरोनामुक्त

एमपीसी न्यूज – ( श्रीपाद शिंदे) दिलेल्या सूचना न पाळल्यास त्याचे निर्बंध होतात आणि हे निर्बंध नागरिकांना खूप जाचक वाटतात. पण नियमांचे तंतोतंत प्रामाणिकपणे पालन केले तर संभाव्य सर्व धोके टाळता येतात. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीत एका वेळी कोरोनाचे तब्बल 74 सक्रिय रुग्ण होते. मात्र सोसायटीने केवळ शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले आणि सोसायटी अवघ्या दोन आठवड्यात कोरोनामुक्त झाली.

याबाबत माहिती देताना रोझलँड सोसायटीचे संतोष म्हसकर म्हणाले, रोझलँड सोसायटीत एकूण एक हजार सदनिका असून, सोसायटीतील लोकसंख्या साडेचार हजार इतकी आहे. मात्र, लॉकडाउनमुळे सोसायटीतील काही नागरिक आणि कुटुंबं बाहेरगावी गेल्याने सध्या अंदाजे अडीच हजार इतके नागरिक सोसायटीत आहेत.

रोझलँड सोसायटीत आतापर्यंत सुमारे 300 रुग्ण आढळले आहेत. परंतु एक ते 15 मे या कालावधीत सोसायटीमधील कोरोना रुग्णसंख्या खूप वाढली होती. या कालावधीत सुमारे 74 सक्रिय रुग्ण होते. ही संख्या कमी करणे ही सोसायटी मधील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी होती.

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी रोझलँड सोसायटीने ‘कोविड प्रोटेक्शन टीम’ तयार केली. या टीमने पुढाकार घेऊन शासनाने दिलेल्या सूचना सोसायटी मधील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवल्या. सोसायटीचे गार्डन आणि इतर सार्वजनिक ठिकाणे, जिथे लोकांची गर्दी होईल ; अशा ठिकाणांवर टीम लक्ष ठेऊन होती. नागरिकांना मार्गदर्शन करत होती.

नागरिक देखील कोविड प्रोटेक्शन टीमला सहकार्य करत होते. रोझलँड सोसायटी कोरोना मुक्त होण्यात कोविड प्रोटेक्शन टीम पेक्षा नागरिकांचे योगदान अधिक आहे. नागरिकांनी मनावर घेऊन नियम पाळण्याचे ठरवले आणि नियम पळून दाखवले.

सोसायटीमधील नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडूच नये, अशी आम्ही व्यवस्था केली असल्याचे संतोष म्हसकर म्हणाले. ज्या कुटुंबात कोरोना रुग्ण आहे, तसेच ज्यांना गृह विलगीकरणात ठेवले आहे, त्या कुटुंबातील सदस्यांना घराबाहेर पडता येऊ नये यासाठी त्यांना लागणारे औषधे, जेवण आणि अन्य साहित्य बाहेरून टीमने पुरवले.

कोरोना बाधित रुग्णांना रुग्णालयात बेडची आवश्यकता पडल्यास तसेच रेमडेसिव्हीर सारख्या औषधांची गरज पडल्यास सोसायटी मधील प्रत्येक नागरिकाने शक्य तेवढी मदत केली. यामुळे आवश्यक असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रुग्णालयात योग्य उपचार मिळू शकले.

ज्या नागरिकांना कामासाठी बाहेर जावं लागतं, त्यांनी देखील पूर्ण काळजी घेतली. मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचा काटेकोरपणे अवलंब केला. सोसायटीत येणाऱ्या प्रत्येकाची आवश्यक तपासण्या तसेच गरज भासल्यास कोरोना चाचण्या केल्या. यामुळे कोरोना रुग्णांचे निदान झाले. वेळीच निदान झाल्याने अनेक धोके टाळता आले आहेत.

शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केल्यानेच सोसायटी कोरोना मुक्त झाली आहे. आता रोझलँड सोसायटी मध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. सोसायटी कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असताना सोसायटीने कचरा उचलणारे, स्वच्छता कर्मचारी यांचा यथोचित सन्मान देखील केला असल्याचे म्हसकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.