Pune : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामगारांना 10 हजार रुपये उचल

समितीमधील 8 हजार कामगारांना मिळणार लाभ

एमपीसी न्यूज – कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार पुणे कृषी उत्पन्न बाजार आवारातील कामगारांना माथाडी मंडळाकडून प्रत्येकी 10 हजार रुपये उचल देण्यास सुरवात झाली आहे. या निर्णयाचे कामगार संघटनेने स्वागत केले आहे. साधारण 8 हजार कामगारांना याचा लाभ मिळेल.

दरम्यान, माथाडी मंडळ, कामगारमंत्री व डॉ. बाबा आढाव यांच्या प्रयत्नामुळेच हा आधार मिळाल्याच्या भावना कामगारांनी व्यक्त केल्या आहेत.

मागील 50 दिवसांपासून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला मार्केट बंद आहे. आमच्या संबधीत संस्था बाजार समिती, माथाडी मंडळ , पणन संचालक, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व शासन दरबारी आर्थिक व रेशनची अनेकदा मदत मागितली. पण, मदत मिळाली नाही.

त्यामुळे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मदत मागितल्यावर त्यांनी माथाडी मंडळामार्फत उचल देण्यास सांगितले, अशी माहिती कामगार संघटनेचे संताेष नांगरे यांनी दिली.

महाराष्ट्र सरकार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून हमाल मापाडी व महिला कामगारांना विमा सुरक्षा कवच देण्यात यावे, अशी मागणी माथाडी महामंडळाने केली आहे. तसेच, बाजार घटकांना, आर्थिक मदत, अन्नधान्य किट मिळाले पाहिजे, असे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

दरम्यान, सहकार व पणन मंत्रालयाने बाजार आवारातील कामगारांना मदत करण्याबाबत आदेश काढले होते. मात्र, बाजार समितीने त्यांच्या सोईनुसार अर्थ काढून व कामगार मंत्रालय आणि माथाडी मंडळाकडे अहवाल मागितला. त्यामुळे या घटकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.

याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पणन मंत्री, कामगार मंत्री, पणन संचालक, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पुन्हा निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर डाॅ. बाबा आढाव, हनुमंत बहिरट, नवनाथ बिनवडे, गोरख मेंगडे, संतोष नांगरे, हसन पठाण, किशोर भानुसरे यांच्या सह्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.