Pune : कोरोनाच्या रुग्णांसाठी बालेवाडी येथे 10 हजार खाटांचे रुग्णालय : शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्या पार्श्वभूमीवर बालेवाडी येथे 10 हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

पुणे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. पुण्यात कोरोनाचे रुग्ण आता 3 हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या रोगामुळे 145 नागरिकांचा बळी घेतला आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी – चिंचवड शहरासाठी बालेवाडी येथे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील रुग्णांवरही या ठिकाणी उपचार करता येणार आहेत. चीनमधील वूहान शहरात असेच कोरोना रुग्णांसासाठी हॉस्पिटल उभारण्यात आले होते. साखर आयुक्त सौरभ राव आणि पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्यावर या रुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पुणे शहरात ज्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. त्या रुग्णालयाची क्षमता आता संपली आहे. त्यामुळे तातडीने बालेवाडी येथे 10 हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडाही पुणे महापालिकेने तयार केला आहे. त्यासाठी लागणाऱ्या स्टीलच्या खाटा, व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा पुणे महापालिकेने निर्णय घेतल्याचे आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले.

दरम्यान, कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांना इतरही आजार असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये किडनी विकार, मधुमेह अशा आजारांचा समावेश आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी कोरोना प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्याचा आदेश दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.