Pune : प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या स्वाब टेस्टिंगकरिता 108-रुग्णवाहिका -शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील 5 प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या स्वाब तपासणी व पुढील कार्यवाही करिता “108” रुग्णवाहिका सेवा जागेवरच उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

येरवडा, भवानी पेठ, शिवाजीनगर-घोले रस्ता, कसबा- विश्रामबागवाडा व ढोलेपाटील रस्ता या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्रात प्रत्येकी एक “108, रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांचे घशातील स्त्राव (स्वाब) तातडीने घेण्यात येणार आहे.

हे स्वाब लगेच तपासणी करण्यासाठी राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा NIV येथे पाठविण्यात येणार आहे. त्याचा अहवाल जलद मागवून निर्देशानुसार तातडीने पुढील नियोजन करण्यात येणार आहे.

स्वाब तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अहवालामध्ये निर्देशित केल्यानुसार पुढील उपचारार्थ व्यक्तीस घेऊन जाणे, अशा जलद नियोजनाकरिता स्वाब केंद्राजवळच ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक नियोजनाकरिता एखाद्या भागात, प्रतिबांत्मक क्षेत्राबाहेरही एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्या भागासह त्वरित प्रतिबंधित करण्यात येईल.

तो भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येईल, असे जाहीर करणे अर्थात नागरिकांच्या दृष्टीने व विषाणू प्रादुर्भाव नियंत्रित करण्याच्या दृष्टीने नियोजनाचा भाग राहील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

तसेच, चुकीची माहिती व अफवा यांच्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आयुक्तांनी केले. दैनंदिन सुमारे एक हजारापेक्षा अधिक संख्येने जास्तीत जास्त जलद व नियोजनबद्ध स्वाब घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.