Pune : महापालिकेच्या शाळेतील मुलांना आधार सक्तीचे


एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विध्यार्थ्यांना आधार सक्ती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. शिक्षण विभाग शाळेमधील विद्यार्थ्यांना पुढील वर्षापासून शैक्षणिक साहित्याचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहे. त्यामुळे आधारकार्डसाठी 31 मार्चची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आधारकार्ड नसेल तर पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शालेय साहित्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

पुणे महापालिकेच्या माध्यमातून पालिकेच्या शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी डीबीटी योजना राबविण्यात आली. मात्र, त्यात मुलांच्या खात्यात थेट पैसे न भरता या मुलांना विद्याधन नावाचे डीबीटी कार्ड देण्यात आले. त्यानुसार, या कार्डावरून मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच गणवेश देण्यासाठी शहरातील 43 विक्रेत्यांची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे मुलांना शाळेत साहित्य दिल्यानंतर त्यांचे कार्ड पॉस मशीनवर स्वाइप करून त्याचे पैसे दुकानदारांना दिले जातात. अशा प्रकारे ही योजना राबविली जाते.

मात्र, त्यातही अनेक अडथळे येत असल्याने आता प्रशासनाने थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातच पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बँकेशी जोडणे आवश्यक असल्याने या मुलांना आधार सक्ती केली जाणार आहे. त्यासाठी 31 मार्च 2018 पूर्वी शाळांमध्ये आधार मशिन उपलब्ध करून मुलांना आधारकार्ड दिली जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.