Pune: ‘श्रीमंताचा आजार’ कोरोना आता पोचला झोपडपट्टीपर्यंत! पुण्यात झोपडपट्टीतील दोघांना लागण

एमपीसी न्यूज – परदेश वारी करून आलेल्यांना अथवा श्रीमंतांना होणारा आजार म्हणून कोरोनाकडे पाहिले जात असतानाच पुण्यात झोपडपट्टीतील दोन रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने आता हा विषाणू झोपडपट्टीपर्यंत पोहचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी यापुढे सर्वांनाच विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

पुण्यात गुलटेकडी भागातील झोपडपट्टीत राहणारा एक 70 वर्षीय भाजी विक्रेता व एका 30 वर्षीय महिलेचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. संबंधित भाजी विक्रेता सौदी अरेबियाला जाऊन आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हा कोरोनाबाधित रुग्ण यापूर्वी भाजी विक्रीच्या व्यवसायामुळे अनेकांच्या संपर्कात आलेला आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

झोपडपट्ट्यांमध्ये अत्यंत छोट्या छोट्या झोपड्या व दाट लोकवस्ती असल्याने त्या ठिकाणी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखणे अतिकठीण असते. त्यामुळे झोपडपट्टीमध्ये कोरोना विषाणूचा झपाट्याने प्रसार होण्याचा धोका आहे. आता झोपडपट्टीतच कोरोनाबाधित दोन रुग्ण सापडल्याने तो शहराच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरणार आहे. दोन्ही रुग्णांना पुण्याच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.