Pune : जगाला गरज असणारे शांतीदूत येशू ख्रिस्त ; सर्वधर्मीय स्नेहमेळाव्यात उमटला सूर

ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त आंतरधर्मीय सुसंवाद साधण्यासाठी स्नेहमेळावा

एमपीसी न्यूज- आज जगात प्रचंड अशांतता पाहायला मिळते. धर्माच्या नावाखाली दुभाजन चालू आहे. आपल्या धर्माव्यतिरिक्त इतर धर्मांचा देखील आदर करावा, अशी प्रत्येक धर्मामध्ये शिकवण आहे. जगाला आज येशू ख्रिस्तांच्या शिकवणीची गरज आहे. ज्यांंनी त्यांचा छळ केला त्यांनाही येशू ख्रिस्तांनी क्षमा केली. मानवतेचा संदेश त्यांनी दिला. आज जगाला गरज असणारे शांतीदूत येशू ख्रिस्त आहेत. असा सूर सर्वधर्मीय स्नेहमेळाव्यात उमटला.

डायोसिस आॅफ पुणे आणि स्वच्छंद, पुणे यांच्या वतीने ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त सर्वधर्मीय स्नेहमेळाव्याचे आयोजन रेस कोर्स जवळील एम्प्रेस गार्डन रस्त्यावरील बिशप हाऊस येथे करण्यात आले होते. यावेळी आमदार चेतन तुपे, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे डॉ. शमसुद्दीन तांबोळी, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. दत्तात्रय तापकीर, एस.एम.जोशी सोशल फाऊंडेशनचे प्रा. सुभाष वारे, मुस्लिम विचारवंत अनिस चिश्ती, पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, शीख विचारवंत सत्यपाल सिंह, लेफ्टनंट जनरल डॉ. दुहान, वसईचे सहपोलिस आयुक्त नरसिंह भोसले, माजी पोलीस उपायुक्त राजेंद्र सोनवणे, अजित कुमठेकर,स्वातंत्र्यवीर सावरकर समितीच्या शुभा मराठे ,पर्यावरण तज्ञ डॉ. तारा पाठक, अभिनेत्री स्वाती सद्रे उपस्थित होते. मोहन जावळकर आणि प्रा. रवींद्र शाळू यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी विद्यार्थीनींनी प्रार्थना गीत सादर केले.

पुणे धर्मप्रांताचे बिशप डॉ. थॉमस डाबरे म्हणाले, “येशू ख्रिस्ताने प्रेम, क्षमा आणि ऐक्याची शिकवण दिली. सध्या धर्म, संस्कृती, भाषा या गोष्टींमधील भेदामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. आपल्या प्रत्येकाचा देव एक आहे. येशू देखील सर्वांचा असून सर्वजण येशूचे आहेत. वैश्विक सहिष्णुता ही येशू ख्रिस्त यांची शिकवण आहे” असेही त्यांनी सांगितले.

शमसुद्दीन तांबोळी म्हणाले, “सगळ््याच धर्मांनी एकत्र राहण्याची शिकवण दिली आहे. आज देशात शांतता आणि बंधुतेचा सर्वानी अंगीकार करण्याची गरज आहे. परंतु समाजात काही असे लोक आहेत, जे कट्टरतेच्या नावाखाली इतरांचा द्वेष करीत आहेत. कोणताही धर्म कट्टरतेला मान्यता देत नाही. द्वेषाची भाषा कमी व्हावी, प्रेमाची भाषा वाढावी” असे ही त्यांनी सांगितले.

चेतन तुपे म्हणाले, “आज जगात जी अशांतता आहे. त्यावर बायबलची तत्त्वे अंगीकारणे गरजेची आहेत. वाईटाला संपविण्यासाठी चांगल्या विचारांचे लोक एकत्र यायला हवेत” डॉ. दत्तात्रय तापकीर म्हणाले, “धर्मात शांतता राहिल्याशिवाय देशात शांतता राहणार नाही. विविध धर्मातील लोकांमध्ये प्रेमभाव निर्माण होण्यासाठी सर्व धर्म परिचय करुन घ्यायला हवा. त्यांची तत्वे समजून घ्यायला हवीत. तेव्हा आपल्या लक्षात येईल की सर्व धर्मांची शिकवण आणि त्यांची तत्वे समान आहेत”

प्रा. रवींद्र शाळू यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.