Pune : आता काय अधिकाऱ्यांना लव्ह लेटर पाठवू काय ? भाजपा नगरसेवकाचा उद्विग्न  सवाल 

एमपीसी न्यूज – महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून कामे करवून घ्यायची असतील तर त्यांच्याशी गोड गोड बोलून कामे करवून घ्या असे अनुभवी नगरसेवक सांगतात , बायकोशी गोड बोलत नाही एवढा अधिकाऱ्यांशी मी गोड बोलतो. तरीही कामे होत नाहीत. आता काय अधिकाऱ्यांना लव्ह लेटर पाठवू काय ? असा सवाल आज पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी केला .

गल्ली ते दिल्ली’ सत्तेचा नारा देत सत्तेत आलेले भाजपचे 98 नगरसेवक महापालिकेतील सव्वा वर्षांच्या काळात ‘हतबल’ ठरले आहेत. अगदी गल्लीबोळातील कामांपासून त्यांना ‘अपेक्षित’ कामे होत नाहीत, असा तीव्र आक्षेप घेत या माननीयांनी प्रशासनाचा निषेध करून आपली हतबलता महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत व्यक्त केली आहे.

कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि भाजपच्या नगरसेवकांनी आजच्या मुख्य सभेत निर्ढावलेल्या, कामांसाठी टंगळ मंगळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जोरदार ताशेरे ओढले. याकामी राष्ट्रवादीचे काही नगरसेवक वगळता कॉंग्रेस भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी अशा अधिकाऱ्यांना लक्ष्य करून आयुक्त सौरव राव यांच्यापुढे जाहीरपणे आपली व्यथा आणि संताप व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.