Pune: खडकवासला ते स्वारगेट सायकल ट्रॅक

एमपीसी न्यूज – आरोग्य आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना’ सुरू केली. नागरिकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फुर्तीने सायकलींचा वापर करावा यासाठी महापालिकेच्या वतीने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेचा भाग म्हणून खडकवासला ते स्वारगेट सायकल ट्रॅक विकसित करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांना सायकल खरेदी करण्यासाठी विनाव्याज सुलभ हप्त्याने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे, आशा महत्वपूर्ण घोषणा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी 2020 – 21 च्या अंदाजपत्रकात केल्या आहेत.
पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या हद्दीमध्ये वाहतुकीची कोंडी आणि वाहनतळाची समस्या आहे. विकास आराखड्यामध्ये वाहनतळासाठी राखीव असलेल्या आणि नजिकच्या काळात पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात येऊ शकणार्‍या विविध जागांवर वाहनतळ विकसित करण्यात येणार आहेत.
पुणेकर नागरिक विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती व्हावी यासाठी या उद्देशाने ब्रेमेन चौक परिसरात वाहतूक विषयक माहिती देणारा  ट्रॅफिक  पार्क उभारण्यात येणार आहे. या परिसरातील ११ शाळांतील पाच हजारहून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे. अशाच प्रकारचा ट्रॅफिक पार्क या वर्षी येरवड्यात प्रस्तावित आहे.
शिवणे-खराडी रस्ता
पूर्व आणि पश्‍चिम उपनगराला जोडणार्‍या शिवणे ते खराडी या १८ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे. शिवणे ते म्हात्रे पूल या टप्प्यातील ६ किलोमीटर आणि संगमवाडी ते खराडी या टप्प्यातील ११ किलोमीटर ५०० मीटर रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत या रस्त्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.

कात्रज-कोंढवा रस्ता
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी या रस्त्याची निर्मिती करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे भूसंपादनासह रस्तानिर्मिती सर्व कामे केली जाणार आहेत. कात्रज चौकातील राजस सोसायटी ते कोंढवा-खडी मशीन चौकापर्यंतच्या साडेतीन किलोमीटर लांबीचा आणि ८४ मीटर रूंदीचा रस्ता विकसित करण्यात येत आहे.
बालभारती-पौड फाटा रस्ता
विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता आणि कर्वे रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी विकास आराखड्यात दोन किलोमीटर लांबीचा आणि ३० मीटर रुंदीचा बालभारती-पौड फाटा रस्ता दर्शविण्यात आला आहे. या रस्त्यामुळे पर्यावरणावर काय परिणाम होणार आणि या वाहतूक परिणाम अहवाल तयार करण्यात आले आहेत. सल्लागाराच्या सादरीकरणाला मान्यता मिळाल्यानंतर विकसनाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.